महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘तेरा यार हूं मैं’ या चित्रपटात बिझी आहेत. हिंदी, तामिळ आणि बंगाली भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन एका हॉलिवूड दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम करणार होते. पण आता अमिताभ यांनी या चित्रपटाला नकार दिला आहे. या नकाराचे कारण आहे, भारत-पाकिस्तानातील बिघडलेले संबध.
होय, ऑस्कर विजेते साऊंड डिझाईनर रेसल पोक्यूटी लवकरच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणार आहेत. रेसल यांनी आपल्या या पहिल्या चित्रपटासाठी अमिताभ यांच्याशी संपर्क साधला होता. अमिताभ यांनी या चित्रपटाला होकारही कळवला होता. पण यानंतर तारखांची समस्या उभी राहिली. अमिताभ ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘तेरा यार हूं मैं’ या चित्रपटात बिझी असल्याने हे दोन्ही प्रोजेक्ट पूर्ण झाल्याशिवाय त्यांना तारखा देणे शक्य नव्हते. रसेल यांनी याऊपरही अमिताभ यांच्यासाठी प्रतीक्षा केली. पण यानंतर ऐनवेळी अमिताभ यांनी या चित्रपटाला नकार कळवला. भारत-पाकिस्तानात वाढलेला तणाव या नकारामागचे कारण असल्याचे कळतेय. होय, कारण या चित्रपटात अमिताभ यांना एका पाकिस्तानी व्यक्तिची भूमिका ऑफर केली गेली हेती.
खरे तर रसेल यांनी दोन वर्षांपूर्वी अमिताभसोबत या स्क्रिप्टसंदर्भात चर्चा केली होती. त्यावेळी भारत-पाक उभयतांना शांतीचा संदेश देणारी ही कथा अमिताभ यांना प्रचंड आवडली होती. पण तूर्तास दोन्ही देशातील संवेदनशील वातावरण बघता अमिताभ यांनी या चित्रपटाला नकार देणेच योग्य समजले. ‘तेरा यार हूं मैं’ या अमिताभ यांच्या चित्रपटाबद्दल सांगायचे तर या चित्रपटात अमिताभ यांच्यासह एस जे सूर्या आणि रम्या कृष्णनन लीड रोलमध्ये आहेत. टी तामिलवनन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर भूषण कुमार, दिव्या खोसला, कृष्ण कुमार, ओम प्रकाश भट, सुजय शंकरवर या चित्रपटाचे प्रोड्यूसर आहेत.