बॉलिवूडचा महानायक, शहेनशाह, बिग बी अशा कितीतरी नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh bachchan). आजवरच्या कारकिर्दीत असंख्य सिनेमात झळकलेले बिग बी सध्या कौन बनेगा करोडपती या रिअॅलिटी शोमध्ये सूत्रसंचालकाची जबाबदारी पार पाडत आहेत. या कार्यक्रमामध्ये अनेकदा ते त्यांच्या जीवनातील काही किस्से, घटनादेखील चाहत्यांसोबत शेअर करतात. यात अलिकडेच त्यांनी आंतरजातीय विवाह याविषयी भाष्य केलं. त्यांचं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चिलं जात आहे.
सध्या छोट्या पडद्यावर कौन बनेगा करोडपतीचं १५ वं पर्व गाजत आहे. या पर्वात बिग बींनी त्यांच्या वडिलांचा हरिवंश राय बच्चन यांच्याशी निगडीत एक किस्सा शेअर केला.
"एक सत्य सांगताना खरं तर मला फार संकोचल्यासारखं वाटतंय पण, सरोजिनी नायडू या माझ्या वडिलांच्या मोठ्या चाहत्या होत्या. माझ्या वडिलांनी आंतरजातीय विवाह केला होता. माझी आई तेजी ही शीख कुटुंबातील होती, जेव्हा आम्ही अलाहाबादमध्ये राहत होतो. त्यावेळी दुसऱ्या जातीमधील व्यक्तीशी लग्न करणं पाप मानलं जायचं", असं बिग बी म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "ज्यावेळी माझ्या वडिलांनी लग्न करुन माझ्या आईल अलाहाबादला नेलं त्यावेळी लोकांनी त्यांना कडाडून विरोध केला. त्यावेळी सरोजिनी नायडूच अशा पहिल्या व्यक्ती होत्या ज्यांनी माझ्या आई-वडिलांना पाठिंबा दिला. त्यांनी माझ्या आई-वडिलांची भेट पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याशी करुन दिली होती. मला आजही आठवतंय त्यांनी माझ्या आई-वडिलांची ओळख 'कवि आणि त्यांची कविता यांना भेटा', असं म्हणत करुन दिली होती.