महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची रोल्स रॉयल फँटम ही अलिशान व महागडी गाडी चक्क सलमान खान ( Salman Khan) चालवतो म्हटल्यावर आश्चर्याचा धक्का बसणारच ना? पण हे खरं आहे. हीच कार बेंगळुरू पोलिसांनी जप्त केली आहे.आता हे नेमकं प्रकरण जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल. तर त्यासाठी तुम्हाला पुढची बातमी वाचावी लागेल. तर त्याचं झालं असं की, कर्नाटकातल्या बेंगळुरूमध्ये वाहतूक पोलीस गाड्यांची तपासणी करत होते.
बेंगळुरूच्या विट्टल माल्या मार्गावर प्रत्येक कार थांबवून त्याची कागदपत्रं तपासली जात होती. याचदरम्यान एक आलिशान महागडी रोल्स रॉयस कार तिथे आली. नियमाप्रमाणे पोलिसांनी त्या कारचीही तपासणी केली. पण ही अलिशान गाडी चालवणा-या व्यक्तिकडे कुठलीही कागदपत्रं नव्हती. पोलिसांनी त्याला नाव विचारलं. तर गाडी चालवणा-याचं नावं होतं सलमान खान. गाडी कुणाची आहे विचारल्यावर त्याचं उत्तर होतंं, अमिताभ बच्चन यांची. त्याच्या म्हणण्यावर पोलिस लगेच विश्वास कसा ठेवणार?
त्यांनी लगेच गाडीचं रजिस्ट्रेशन तपासलं तर खरोखरच ती कार महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावे रजिस्टर्ड होती. चालवणारा सलमान खान आणि गाडीचे मालक अमिताभ बच्चन म्हटल्यावर काही क्षण पोलिसही चक्रावले. अर्थात गाडी चालवणारा अभिनेता सलमान खान नव्हता. पण तो चालवत असलेली गाडी मात्र खरोखर अमिताभ बच्चन यांच्या नावावर रजिस्टर्ड होती. आता हे कसं शक्य आहे तर त्याचा खुलासाही नंतर झाला.कर्नाटक परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त नरेंद्र होळकर यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जप्त केलेली कार सलमान नावाची व्यक्ति चालवत होती. पण तो अभिनेता सलमान खान नव्हता. त्याच्या वडिलांनी 2019 मध्ये अमिताभ यांच्याकडून ती गाडी 6 कोटी रूपयांना विकत घेतली होती. दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी 2007 मध्ये अमिताभ यांना ही कार गिफ्ट दिली होती. पुढे 2019 मध्ये उमरा डेव्हलर्पच्या युसूफ शरीफ उर्फ डी बाबू यांना अमिताभ यांनी ती कार विकली. मात्र ती अजूनही अमिताभ यांच्याच नावावर आहे. पुरेसी कागदपत्रं नसल्याने आम्ही ही कार जप्त केली आहे.