हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह महानायक अमिताभ बच्चन गेल्या पाच दशकापासून रसिकांना आपल्या अभिनयाने मनोरंजन करत आहेत. रोज काही ना काही नवीन रसिकांना काय देता येइल याच गोष्टीचा ध्यास त्यांना असतो. सिनेमाच्या निमित्ताने अमिताभ यांचे दर्शन आजही रसिकांना घडत असते. सिनेमासह ते सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. नेहमीच सकारात्मक विचार शेअर करत इतरांनाही निस्वार्थ जगण्याचा कानमंत्रच ते देतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी निगडीत एक खास गोष्ट समोर आली आहे. हे वाचून तुम्हीही भावूक व्हाल.
अमिताभ यांनी ट्विटरवर एक जुना फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी फोटोसंदर्भात एक जुना किस्सा सांगितला. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'कुलीच्या घटनेनंतर जेव्हा मृत्यूच्या मुखातून बाहेर आलो, त्यावेळचा हा फोटो आहे. आयुष्यात पहिल्यांदाच मी माझ्या वडिलांना रडताना पाहिले होते. हीच चिंता अभिषेकच्या चेह-यावरही दिसत होती. या फोटोवर बिग बी यांना एका चाहत्याने प्रश्न विचारला की, तुम्ही कधीच परदेशात उपचारासाठी गेले नाही. जेव्हा इतर कलाकार नेहमी जात असतात. तुम्ही नेहमीच भारतीय डॉक्टरांवर विश्वास ठेवला.
या चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना बिग बी यांनी सांगितले की, ' उपचारासाठी आम्हीही परदेशात जाऊ शकलो असतो, आमच्याकडे साधने होती पण तरीही आम्ही आमच्या भारतीय डॉक्टरांकडून उपचार करुन घेणेच पसंत केले. आपल्या देशात सर्व सुविधा उपलब्ध असताना इतर ठिकाणी का बरं जावे. या उत्तराने पुन्हा एकदा रसिकांची मनं अमिताभ यांनी जिंकली. त्यांचे हे ट्विट तुफान व्हायरल होत असून सारेच त्यांचे कौतुक करत आहेत.
अमिताभ बच्चन यांचे असंख्य चाहते आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात अमिताभ यांचे फॅन्स पसरलेत. ट्विटर,फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्स सेलिब्रिटींशी संवाद साधत असतात. अमिताभ यांचेही ट्विटर, फेसबुकवर, इन्स्टाग्रावर अनेक फॅन्स आहेत. दिवसेंदिवस चाहत्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळेच ट्विटरवर बिग बीचे 45 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. ट्विटरवर अमिताभ यांनी 45 मिलियन फॉलोअर्स टप्पा गाठल्याबद्दल सर्वांचे आभारही मानले.