अमिताभ बच्चन हे स्ट्रिक्ट लाईफस्टाईलसाठी ओळखले जातात. ते आता धूम्रपान किंवा मद्यपान करत नाहीत. पण तुम्हाला माहीत आहे का की, एक काळ असा होता जेव्हा अमिताभ दिवसाला तब्बल २०० सिगारेट ओढायचे. याबाबत अमिताभ यांनी स्वत:च एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं. अमिताभ यांनी सांगितलं की, ते नॉनव्हेज खात नाहीत, पण त्यांच्या पत्नी जया नॉनव्हेज खातात.
"मी सर्वकाही सोडून दिलं"
अमिताभ म्हणाले, "'मी धूम्रपान करत नाही, मद्यपान करत नाही आणि नॉनव्हेजही खात नाही. हे कोणत्याही धर्मामुळे नाही तर टेस्टमुळे आहे. माझ्या कुटुंबात माझे वडील शाकाहारी होते. पण माझी आई शाकाहारी नव्हती. तसंच जया नॉनव्हेज खातात आणि मी खात नाही. मी पूर्वी खायचो. मी सुद्धा मद्यपान आणि धुम्रपान करायचो, पण आता मी सर्वकाही सोडून दिलं आहे."
दिवसाला २०० सिगारेट ओढायचे
"कोलकातामध्ये मी दिवसाला २०० सिगारेट ओढायचो, होय २००. पण मुंबईत आल्यानंतर मी ते सर्वकाही सोडलं. मी मद्यपान करायचो. काही वर्षांपूर्वी मी ठरवलं की, मला या सर्व गोष्टींची गरज नाही. या सवयींमुळे मला कोणतीही अडचण येत नाही. फक्त मी परदेशात शूटिंग करत असताना अडचण असते, कारण तिथे शाकाहारी जेवणाची समस्या आहे."
"कॉलेजच्या दिवसांत मारामारी झाली"
अमिताभ बच्चन पुढे म्हणाले की, ते अहिंसक व्यक्ती आहेत. "मी हिंसक व्यक्ती आहे असं मला वाटत नाही. मी माझा संयम देखील गमावत नाही. हो, कॉलेजच्या दिवसांत मारामारी झाली होती, पण तेवढीच. स्क्रीनवर भांडणं खूप दुर्मिळ असतात. ते शानदार असलं पाहिजे आणि लोकांनी ते तसंच स्वीकारलं पाहिजे" असंही अमिताभ यांनी सांगितलं आहे.