समाजातील वास्तव उत्तमरित्या पडद्यावर मांडणारा लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे (nagraj manjule). 'नाळ', 'सैराट', 'पिस्तुल्या' या गाजलेल्या चित्रपटांच्या यशानंतर नागराज मंजुळे यांनी 'झुंड (Jhund) या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. विशेष म्हणेज या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर सातत्याने त्याची चर्चा रंगत आहे. यामध्येच आता या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर (Trailer) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन (amitabh bachchan ) मुख्य भूमिका साकारत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.
कसा आहे ट्रेलर?
प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये अमिताभ बच्चन झोपडपट्टीतील मुलांमध्ये फुटबॉलचं प्रेम जागृत करुन त्यांना कसं सरळ मार्गावर आणतात हे थोडक्यात दाखवण्यात आलं आहे. या ट्रेलरमध्ये सुरुवातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. गरीबी, अवहेलना यामुळे वाईट मार्गाला लागलेली, नशेच्या आहारी गेलेल्या मुलांमध्ये विजय ( अमिताभ बच्चन) यांना खिलाडू वृत्ती दिसते. त्यामुळे या मुलांना नीट ट्रेनिंग मिळालं.तर ते राष्ट्रीय स्तरावर नक्कीच चांगली कामगिरी करतील अशी त्यांना आशा असते. त्यामुळे विजय या मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात करतात. मात्र, केवळ झोपडपट्टीत राहतात किंवा चांगल्या शाळा-कॉलेजमध्ये ते न शिकल्यामुळे अनेकदा त्यांना काही जण फुटबॉल खेळण्यापासून रोखतात. मात्र, विजय हार न मानता त्यांना ट्रेनिंग देतात. विशेष म्हणजे ही मुलंदेखील विजय यांच्या कष्टाचं चीज करतात. असं एकंदरीत या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला 'झुंड' हा चित्रपट ४ मार्च २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या व्यतिरिक्त रिंकू राजगुरु (rinku rajguru), आकाश ठोसर (akash thosar) आणि किशोर कदम (kishor kadam) मुख्य भूमिकेत झळकले आहेत. हा चित्रपट स्पोर्ट्स ड्रामा प्रकारातील आहे.