‘सैराट’ फेम नागराज मंजुळे यांच्या पहिला वहिला हिंदी चित्रपट ‘झुंड’ येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नागपुरात या चित्रपटाचे शूटींग सुरु झालेय आणि खुद्द महानायक अमिताभ बच्चन या चित्रपटाच्या शूटींगसाठी नागपुरात आले आहेत. काल सोमवारी अमिताभ नागपूर विमातळावर उतरले. खुद्द अमिताभ यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर याची माहिती दिली आहे. नागपूर विमानतळावरचे दोन फोटो शेअर करत आपण नागपुरात असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘NAGPUR .. for 'Jhund' .. the new project by Nagraj , his first in Hindi, the maker of 'Sairat' the Marathi block buster .. a centre of attraction .. and NAGPUR, geographically apparently the centre of geographic India .. may the 2 centres thrive ,’ असे अमिताभ यांनी लिहिले आहे.
काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी नागराज यांच्या या चित्रपटातून माघार घेतल्याची खबर आली होती. प्रारंभी या चित्रपटासाठी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात भव्य सेट लावण्यात आला होता. मात्र त्याला काही संघटनांनी विरोध केल्यामुळे तो काढावा लागला होता. यामुळे चित्रपटाचे अख्खे वेळापत्रक विस्कटले होते आणि याचा परिणाम म्हणजे, अमिताभ बच्चन यांचे वेळापत्रकही वेळापत्रक बिघडले होते. यामुळे वैतागून अमिताभ यांनी या चित्रपटातून माघार घेतल्याचे म्हटले गेले होते. अमिताभ यांचा हा चित्रपट फुटबॉल कोच विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे.‘झुंड’ हा चित्रपट भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज, राज हिरेमथ आणि नागराज मंजुळे असे सगळे मिळून प्रोड्यूस करत आहेत. हा नागराज यांचा बॉलिवूडचा पहिला हिंदी सिनेमा असणार आहे आणि या पहिल्या चित्रपटात महानायक अमिताभ दिसणार आहेत. साहजिकचं त्यांच्यासाठीचं नव्हे तर तमाम मराठीजनांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.