सलमान खान व शाहरूख खान ईद व आपल्या वाढदिवसाच्या दिवशी घराबाहेर जमलेल्या चाहत्यांना भेटतात. तर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) दर रविवारी आपल्या फॅन्सला भेटण्यासाठी घराबाहेर येतात. दर रविवारी त्यांच्या जलसा बंगल्याबाहेर चाहते गर्दी करतात. अमिताभ या चाहत्यांना निराश करत नाही. ते आवर्जुन घराबाहेर येतात. मोठ्या प्रेमाने आणि विनम्रपणे चाहत्यांना अभिवादन करत, त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करतात. पण आताश: जलसाबाहेर जमणाऱ्या चाहत्यांची गर्दी घटू लागली आहे. अमिताभ यांनी एका ब्लॉगमध्ये याबद्दल लिहिलं आहे. चाहत्यांना भेटण्याआधी ते नेहमीच चप्पल काढतात. याचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.
गेल्या रविवारी 30 ऑक्टोबरला अमिताभ बच्चन यांच्या जलसा या बंगल्याबाहेर चाहत्यांची अशीच गर्दी जमली. बिग बी या चाहत्यांना भेटण्यासाठी बाहेर आले. सर्वप्रथम त्यांनी पायातील चप्पल काढली आणि मग चाहत्यांना हात हलवत अभिवादन करत त्यांनी चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला. त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं, ‘चाहत्यांना भेटण्याआधी पायातील चप्पल काढणं ही माझी चाहत्यांप्रतीची भक्ती आहे. माझ्या चाहत्यांना भेटण्याआधी मी शूज किंवा चप्पल काढतो. ही माझी त्यांच्याप्रती असलेली भक्ती आहे.
पण आता ते चैतन्य उरलेलं नाही...पुढे त्यांनी लिहिलंय, ‘चाहते आजही गर्दी करतात. पण माझ्या लक्षात आलंय की आता चाहत्यांच्या संख्येत घट झाली आहे. उत्साह कमी झाला आहे. आधी लोक आनंदाने ओरडायचे. पण आता त्या आवाजाची जागा मोबाईलच्या कॅमेऱ्यांनी घेतली आहे. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे आता काळ बदलला आहे. कुठलीही गोष्ट चिरंतर राहत नाही... कोरोना काळात अमिताभ यांनी चाहत्यांना भेटण्याची परंपरा बंद केली होती. पण कोरोना स्थिती निवळल्यानंतर एप्रिल 2022 पासून ते दररविवारी न चुकता चाहत्यांना भेटायला बाहेर येतात. अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, याचवर्षी त्यांचा ब्रह्मास्त्र हा सिनेमा रिलीज झाला होता. यानंतर रनवे 34, गुडबाय या चित्रपटातही ते दिसले. लवकरच ते उंचाई, गणपत, घूमर, द उमेश क्रॉनिकल्स, बटरफ्लाय व प्रोजेक्ट के या चित्रपटात दिसणार आहेत.