बॉलिवूडचा शहेनशाह म्हणून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे गेल्या कित्येक वर्षांपासून कलाविश्वावर राज्य करत आहेत. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी असंख्य गाजलेले चित्रपट केले. त्यामुळे कलाविश्वावर त्यांचा एक प्रकारचा दबदबा आहे. बिग बींच्या फिल्मी करिअरसोबतच त्यांच्या वैयक्तिक जीवनाचीही बऱ्याचदा चर्चा रंगते. यात खासकरुन त्याच्या लव्ह लाइफची चर्चा होताना पाहायला मिळते. बिग बी आणि रेखा यांच्या नात्याविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. आजही त्यांच्या नात्याविषयीच्या चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगतात. जया बच्चन यांच्यासोबत लग्न करणाऱ्या बिग बींचं रेखावर प्रेम होतं असं म्हटलं जातं. परंतु, सध्या सोशल मीडियावर त्यांच्या शालेय जीवनातील क्रशविषयी चर्चा रंगली आहे. अलिकडेच 'कौन बनेगा करोडपती'च्या (Kaun Banega Crorepati 14) मंचावर त्यांनी त्यांच्या पहिल्या क्रशविषय़ी खुलासा केला.
अलिकडेच या शोमध्ये पूजा बोबडे ही स्पर्धक हॉटसीटवर बसली होती. यावेळी तिच्याशी चर्चा करत असताना बिग बींनी त्यांच्या पहिल्या क्रशविषयी सांगितलं. शाळेत असताना तुमची आवडती शिक्षिका कोण होती असा प्रश्न पूजाने बिग बींना विचारला. त्यावर उत्तर देताना त्यांनी त्यांच्या क्रशविषयी सांगितलं.
"शाळेत असताना माझी परिस्थिती काही फार चांगली नव्हती. मला कायम वर्गातून बाहेर काढलं जायचं. त्यामुळे दररोज शिक्षा मिळणं हा माझ्यासाठी सवयीचा भाग झाला होता. याच कारणामुळे मी कोणाचा आवडता विद्यार्थी नव्हतो", असं अमिताभ बच्चन म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "माझे कोणते आवडते शिक्षक नव्हते. मला कायम शिक्षा दिली जायची. त्यामुळे कोणते शिक्षक माझ्या आवडते असतील का? कोणत्याही शिक्षिकेसोबत फ्लर्ट करायची माझी हिंमत तरी होईल का? आणि, जरी माझं कोणी क्रश असतं तरीदेखील मी तुम्हाला ते सांगणार नाही."
दरम्यान, बिग बींनी दिलेल्या या मजेशीर उत्तरांमुळे केबीसीच्या मंचावर एकच हास्यकल्लोळ माजला. सध्या केबीसचं १४ वं पर्व सुरु असून हा शो कायमच चर्चेत येत असतो. त्याचप्रमाणे यंदाचंही पर्व लोकप्रिय होताना दिसत आहे.