कोरोनाच्या महामारीत प्रत्येकासाठी काम करणे कठीण झाले आहे. प्रत्येकजण स्वत:ची काळजी घेतोय. पण कोरोनाची धास्ती प्रत्येक मनात घर करून बसली आहे. महानायक अमिताभ बच्चन हेही याला अपवाद नाहीत. अमिताभ यांनी कोरोनाची इतकी धास्ती घेतलीय की, माझ्यासाठी दुसरा कुठला जॉब मिळेल का? अशी विचारणा त्यांनी चाहत्यांना केली आहे. अमिताभ बच्चन यांनी नुकतीच कोरोनावर मात केली. 23 दिवसानंतर त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. पण त्यांच्या मनातील करोनाची भीती अद्याप गेलेली नाही. त्यांच्या ताज्या ब्लॉगमध्ये त्यांनी ही भीती बोलून दाखवली.
‘अनेक प्रकारच्या समस्या व चिंता आहेत, यात काहीही दुमत नाही. कोरोना काळात 65 वर्षांवरील व्यक्ति कामासाठी बाहेर जाऊ शकत नाही, हे सरकारी अधिकाºयांनी निश्चित केले होते. माझ्या सारख्यांसाठी हे पॅक अप सारखे आहे. पण आता कोर्टाने 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगसाठी परवानगी दिली खरी, पण ते स्वातंत्र्य अनुभवता येत नाही. मनात कायम भीती घर करून राहते. माझ्यासाठी दुसरा कुठला जॉब असेल तर मला सांगा,’ अशा आशयाचा ब्लॉग बिग बींनी लिहिला आहे.
अमिताभ यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली होती. अभिषेक, ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या बच्चन शिवाय अभिषेक या सर्वांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. यानंतर चौघांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर सर्वांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.