Join us

अमिताभ बच्चन यांनी जेव्हा घेतला होता संन्यास, तब्बल ४१ दिवस केलं होतं कडक नियमांचं पालन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 11:38 AM

तुम्हाला हे माहीतीये का की, अमिताभ यांनी खऱ्या आयुष्यात संन्यास घेतला होता.

अमिताभ बच्चन हे चित्रपट जगतातील सम्राट म्हणून ओळखले जातात. अमिताभ यांनी बाॅलिवूड चित्रपटांमध्ये मोठा काळ गाजवलाय. त्यांचं खरं आयुष्यही एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. अशातच अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित अशी एक घटना समोर आली आहे, जी तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल. अमिताभ यांनी आपली लक्झरी जीवनशैली सोडून ४१ दिवस संन्यास घेत ते कुटुंबापासून दूर राहिले होते.

अमिताभ यांनी 1984 मध्ये शराबी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आयटीएमबीला एक मुलाखत दिली होती. यावेळी बिग बींना विचारण्यात आलं की त्यांनी त्रिदंडी संन्यास घेतला आहे का? यावर होकार देत ते म्हणाले होते,  'यामध्ये ४१ दिवस उपवास ठेवला जातो. कुटुंबापासून अंतर राखाव लागतं. दारू आणि मांसाहार सोडून, अनवाणी राहावं लागतं. तसेच भगवी वस्त्रे परिधान करावी लागतात आणि जमिनीवर झोपावे लागतं. याला एक प्रकारची निवृत्तीही म्हणता येईल'. 

अमिताभ बच्चन म्हणाले, 'केरळमध्ये शबरीमाला मंदिर आहे, जे भगवान अय्यपा स्वामींना समर्पित आहे.  त्यांच्यासाठी उपवास करताना हे नियम पाळले जातात. मी खडकाळ डोंगराळ प्रदेशातून ४० मैलांचा प्रवास केला होता. माझा कोणता नवस नव्हता, पण, माझे काही मित्र हे करत असत, म्हणून त्यांना पाहून मी देखील हे केलं. यानंतर मला खूप आनंद झाला होता'.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांच्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. लवकरच ते प्रोजेक्ट के या चित्रपटात  साऊथचा सुपरस्टार प्रभाससोबत दिसणार आहेत. हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. याशिवाय दीपिका पदुकोणही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 9 मे 2024 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याआधी गेल्या वर्षी अमिताभ बच्चन अभिनेता टायगर श्रॉफच्या 'गणपत' या चित्रपटात दिसले होते. 

टॅग्स :अमिताभ बच्चनसेलिब्रिटीबॉलिवूड