तू कोरोनाने मेलास तर बरा... असे म्हणणा-या एका हेटर्सला अलीकडे अमिताभ बच्चन यांनी सडेतोड उत्तर दिले होते. यानंतर अशाच एका हेटर्सला त्यांनी फैलावर घेतले होते. सत्य माहित नसेल तर स्वत:च्या स्वच्छ तोंडाला स्वच्छच ठेवावं, अशा शब्दांत अमिताभ यांनी या ट्रोलरची बोलती बंद केली होती. आता दानधर्म का करत नाही? असे विचारणा-या ट्रोलरला उत्तर देताना त्यांनी चक्क दानधर्माची भलीमोठी यादीच दिली.
कहने की सीमा होती है, सहने की सीमा होती है, कुछ मेरे भी वश में, कुछ सोच समझ अपमान करो मेरा... या आपल्या वडिलांच्या कवितेच्या काही ओळींनी सुरुवात करत अमिताभ यांनी रक्षाबंधनावर एक ब्लॉग लिहिला होता.मात्र या ब्लॉगवर प्रतिक्रिया देताना काहींनी अमिताभ यांना ट्रोल करणे सुरु केले. ‘तुम्ही दानधर्म का करत नाही? तुमच्या वॉलेटवर परमेश्वराची कृपा आहे. अशात तुमच्यासारख्या व्यक्तिने आदर्श निर्माण करायला हवा. बोलणे सोपे असते पण जगापुढे आदर्श निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे,’ अशा शब्दांत एका ट्रोलरने अमिताभ यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
यापूर्वीही लॉकडाऊनमध्येही अनेकांनी अमिताभ यांना मदतीवरून ट्रोल केले होते. लॉकडाऊनमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार दान करत असताना अमिताभ शांत का? असा सवाल करत लोकांनी त्यांना ट्रोल केले होते. त्यावेळी अमिताभ यांनी ट्रोलर्सला थेट उत्तर देणे टाळले होते. पण आता मात्र पुन्हा दानधर्मावरून ट्रोल होताच अमिताभ संतापले आणि त्यांनी दानधर्माची चक्क यादीच दिली.
आपल्या ब्लॉगमध्ये त्यांनी भलीमोठी यादी मांडली. त्यांनी लिहिले, ‘लॉकडाऊन काळात रोज 5000 लोकांना दुपारचे व रात्रीचे भोजन दिले. मुंबईहून जाणा-या 1200 स्थलांतरित मजुरांना जोडे-चपला दिल्या. बिहार व युपीत जाऊ इच्छिणाºया मजुरांसाठी बसगाड्यांची सोय केली. 2009 स्थलांतरितांसाठी तर संपूर्ण ट्रेन बुक केली होती. मात्र राजकारणामुळे ही ट्रेन रद्द झाली तेव्हा इंडिगोच्या 6 विमांनाद्वारे 180 मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवले. आपल्या खर्चाने 15000 पीपीई किट्स दिल्यात. 10000 मास्क दिलेत. दिल्लीत शिख समुदायाच्या अध्यक्षांना मोठी देणगी दिली. कारण ते गरिबांना भोजन पुरवत आहेत. मी बोलत नाही तर करतो. हेच माझे तत्त्व आहे. पण आज तुम्ही मला बोलायला भाग पाडले. मला माझ्या दानाबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागतेय, याचे मला दु:ख आहे.’