बॉलिवूडचा शहेनशहा, बिग बी, महानायक अशा कितीतरी नावाने प्रचलित असलेला अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन (amitabh bachchan). आज इंडस्ट्रीमध्ये त्यांचा मोठा दबदबा आहे. जवळपास ५ दशकांपेक्षा जास्त काळ इंडस्ट्रीत काम करणाऱ्या बिग बी यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमा दिले. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे जंजीर. हा सिनेमा त्यांच्या कारकिर्दीमधील अत्यंत महत्त्वाचा सिनेमा असून हाच सिनेमा त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंटही ठरला. कारण, या सिनेमात काम करण्यापूर्वी त्यांनी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, केवळ त्यांची पत्नी अभिनेत्री जया बच्चन (jaya bachchan) यांच्यामुळे बिग बींचं करिअर वाचलं आणि ते नव्या दमाने प्रेक्षकांसमोर आले.
जंजीर (zanjeer) या सिनेमामुळे अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन ही नवीन ओळख मिळाली. या सिनेमातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती. इतकंच कशाला आजदेखील ही भूमिका आणि सिनेमा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. परंतु, हा सिनेमा करण्यापूर्वी बिग बींचे जवळपास ११ सिनेमा फ्लॉप झाले होते. ज्यामुळे त्यांनी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, त्यांच्या पडत्या काळात जया बच्चन यांनी त्यांची साथ दिली आणि त्यांच्या करिअरला एक कलाटणी दिली.
धर्मेंद्र, दिलीपकुमारने धुडकावलेला सिनेमा पडला बिग बींच्या पदरात
सलीम खान यांनी जावेद अख्तर यांच्यासोबत जंजीरची पटकथा लिहिली होती. त्यामुळे अरबाज खानच्या टॉक शोमध्ये त्यांनी या सिनेमाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. यावेळी त्यांनी जया बच्चनमुळे कसं बिग बींचं करिअर वाचलं हे सुद्धा सांगितलं. जंजीर सिनेमासाठी प्रथम धर्मेंद्रला कास्ट कारण्यात आलं होतं. मात्र, त्याने हा सिनेमा नाकारला. त्यानंतर दिलीप कुमार यांनाही हा सिनेमा ऑफर झाला होता. परंतु, त्यांनीही सुद्धा तो धुडकावला. त्यांच्यानंतर अमिताभ बच्चन यांना या सिनेमाची ऑफर देण्यात आली. मात्र, अमिताभ यांचे लागोपाठ ११ सिनेमा फ्लॉप झाल्यामुळे जंजीरचे दिग्दर्शक प्रकाश मेहरा त्यांना कास्ट करायला तयार नव्हते.
जया आणि अमिताभ बच्चनने सुद्धा जंजीरकडे फिरवली होती पाठ
एकीकडे जंजीरला अनेक दिग्गज कलाकारांनी नकार दिल्यामुळे बिग बी देखील हा सिनेमा करण्यास उत्सुक नव्हते. मुळात यापूर्वी ११ सिनेमा फ्लॉप झाल्यामुळे हा सिनेमासुद्धा फ्लॉप होईल ही भीती त्यांच्या मनात होती. इतकंच नाही तर त्यांनी इंडस्ट्री सोडण्याचाही निर्णय घेतला होता. दुसरीकडे या सिनेमासाठी अभिनेत्यांसोबतच काही अभिनेत्रींनीही हा सिनेमा करण्यास नकार दिला होता. या सिनेमात अभिनेत्रींसाठी फारसा मोठा रोल नव्हता. त्यामुळे त्या सुद्धा याकडे पाठ फिरवत होत्या. परंतु, केवळ अमिताभ बच्चनसाठी जया यांनी हा सिनेमा करायचं ठरवलं.
जया बच्चनमुळे वाचलं बिग बींचं करिअर
सलीम खान यांनी ठरवलं होतं की, हा सिनेमा विकायचा आणि तो हिट करायचा असेल तर त्यात जयाला कास्ट करावं लागेल. पण, जयानेही या सिनेमासाठी नकार दिला. तिच्या नकारानंतर सलीम यांनी अमिताभसाठी हा सिनेमा किती महत्त्वाचा आहे हे तिला समजावून सांगितलं त्यानंतर तिने या सिनेमासाठी होकार दिला. या सिनेमात तुझ्यासाठी फारसं काही नाहीये. पण, अमिताभसाठी हा सिनेमा खूप महत्त्वाचा आहे. हा सिनेमा त्याच्या करिअरमध्ये मोठा धमाका करु शकतो, त्यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर जयाने हा सिनेमा करण्यास होकार दिला. विशेष म्हणजे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. इतकंच नाही तर या सिनेमामुळे अमिताभचं नशीब पालटलं आणि ते सुपरस्टार झाले.