अमिताभ बच्चन यांना कुली या चित्रपटाच्यावेळी झालेला अपघात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. अमिताभ त्यावेळी जवळजवळ दोन महिने रुग्णालयात होते. अमिताभ बच्चन २६ जुलै १९८२ ला बंगलुरुमध्ये कुली चित्रपटाची शूटिंग करत होते. पुनित इस्सर यांना अमिताभ यांच्या तोंडावर बुक्का मारून त्यांना टेबलवर पाडायचे होते. हा सीन थोडासा अवघड असल्याने अमिताभ यांच्या बॉडी डबलने हा सीन करावा असे चित्रपटाच्या टीमचे म्हणणे होते. पण अमिताभ यांनी ते दृश्य स्वतः द्यायचे ठरवले. त्यांनी हा सीन खूप चांगल्याप्रकारे दिला. पण हा सीन झाल्यानंतर काहीच वेळात त्यांच्या लक्षात आले की, या टेबलचा कोपरा त्यांना पोटात लागला असून त्यांना खूपच दुखत आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना हॉटेलवर आराम करण्यासाठी पाठवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी देखील त्यांची तपासणी केली. पण त्यांच्या शरीरातून अजिबातच रक्त येत नव्हते. त्यांना मुकामार लागला असल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आणि त्यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला. पण दुसऱ्या दिवशी देखील त्यांच्या तब्येतीत काहीच फरक पडला नाही. त्यामुळे एक्स रे काढण्यात आला. पण एक्स रे पाहून काहीच गंभीर नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. केवळ त्यांच्या डायफ्रामाच्या खाली गॅस दिसत होता. त्यामुळे त्यांच्या आतड्याला छोटीशी दुखापत झाली असल्याचे डॉक्टरांना वाटले. पण ही दुखापत गंभीर नसल्याचे निदान झाल्याने त्यांना केवळ औषधं देण्यात आली. अपघाताच्या चौथ्या दिवशी त्यांची परिस्थिती खूपच बिघडली. त्यांना खूप ताप येत होता आणि त्यांना सतत उलट्या होत होत्या. त्यांचे हृद्याचे ठोके देखील प्रचंड वाढले होते. त्यामुळे वेल्लोरच्या प्रसिद्ध सर्जन एच.एस. भट्ट यांनी अमिताभ यांचे सगळे रिपोर्ट पाहिले आणि त्यांच्या शरीरात इन्फेक्शन पूर्णपणे पसरले असून त्यांच्यावर तात्काळ ऑपरेशन करण्याची गरज असल्याचे सांगितले. ऑपरेशन करताना डॉक्टरांच्या लक्षात आले की, त्यांच्या पोटातील महत्त्वाच्या आतडीला प्रचंड दुखापत झाली होती. त्यांचे ऑपरेशन यशस्वी झाले. पण त्यानंतर त्यांना लगेचच निमोनिया झाला. त्यामुळे त्यांचे रक्त पातळ होत होते. ब्लड डेंसिटी अतिशय कमी झाली होती. त्यामुळे मुंबईतून ब्लड डेंसिटी सुधारण्यासाठी ब्लड सेल्स मागवण्यात आल्या. त्यानंतर एक-दोन दिवसांनी त्यांची तब्येत सुधारली. पण पुन्हा त्यांना प्रचंड त्रास व्हायला लागला. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णायलात दाखल करण्याचे डॉक्टरांनी ठरवले. मुंबईला आणल्यावर त्यांच्यावर पुन्हा ऑपरेशन करण्यात आले. हे ऑपरेशन जवळजवळ आठ तास सुरू होते. हे ऑपरेशन यशस्वी झाले आणि त्यानंतर महिनाभराने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
कुलीच्या अपघाताच्यावेळी दोन महिने अमिताभ बच्चन होते रुग्णालयात, चौथ्या दिवशी गेले होते कोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 11:04 AM