अमिताभ बच्चन यांना एक गोष्ट चांगलीच सतावत असून त्यांनीच या गोष्टीविषयी नुकतेच त्यांच्या ब्लॉगद्वारे सांगितले आहे. अमिताभ बच्चन कामात कितीही व्यग्र असले तरी ते न चुकता ब्लॉग लिहितात आणि त्यांचे फॅन्स त्यांच्या ब्लॉगची आतुरतेने वाट देखील पाहात असतात. अमिताभ बच्चन आज या वयातही एखाद्या तरुण कलाकाराप्रमाणे सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी काल त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलेल्या एका गोष्टीमुळे त्यांचे फॅन्स चांगलेच टेन्शनमध्ये आले आहेत.
अमिताभ बच्चन यांनी काल त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, मला आता फोटो अंधुक दिसायला लागले आहेत. कधी कधी एकच वस्तू डबल दिसते. त्यामुळे काही दिवसांपासून मला भीती वाटायला लागली आहे की, माझी दृष्टी जाईल... आणि माझे आयुष्य अंधारमय होईल... पण माझ्या डॉक्टरांनी मला विश्वास दिला आहे की, माझी दृष्टी पूर्णपणे जाणार नाही. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक सुचनेचे मी व्यवस्थितपणे पालन करत आहे. मी माझा जास्तीत जास्त वेळ कॉम्प्युटरच्या स्क्रीनसमोर घालवल्याने माझ्या डोळ्यांना त्रास होतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
या ब्लॉगमध्ये अमिताभ यांनी लिहिले आहे की, आज मला माझ्या आईची प्रचंड आठवण येत आहे. माझ्या डोळ्याला छोटीशी देखील दुखापत झाली तर ती लगेचच तिच्या साडीच्या पदरावर फुंकर मारून तो पदर माझ्या डोळ्यांवर ठेवत असे... आणि चमत्कार म्हणजे दोनच मिनिटांमध्ये मला बरे वाटायला लागत असे... मी आजही हीच गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो. मी गरम पाण्यात टॉवेल भिजवतो आणि तो माझ्या डोळ्यांवर ठेवतो. याचा मला प्रचंड फायदा होतो.