अमिताभ बच्चन सध्या ‘ब्रह्मास्त्र’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. पण अमिताभ यांना सध्या एक गोष्ट छळतेय. होय, लोक आपल्यावर जितके प्रेम करतात, त्या मोबदल्यात आपण फार कमी परतफेड करू शकतो, ही खंत त्यांना आहे. आपल्या ताज्या पोस्टमध्ये त्यांनी ही खंत बोलून दाखवली. ‘मी चित्रपटाच्या दुनियेत आलो, तेव्हापासून आजपर्यंत या क्षेत्रात प्रचंड बदल झाले आहेत. आजघडीला एका चित्रपटावर शेकडो युनिट सदस्य व क्रू सदस्य काम करतात. निर्मिती आणि प्रॉडक्शनदरम्यान प्रत्येक लहानातल्या लहान गोष्टीला महत्त्व दिले जाते. हे सगळे पाहून मी थक्क होतो. माझ्या युनिटमधील लोक माझी प्रचंड चिंता आणि काळजी घेतात. मला थोडाही त्रास होऊ नये, यासाठी धडपडतात. माझ्यासाठी त्यांची चाललेली ही अतिधडपड पाहून मला प्रचंड दडपण येत़़. मला या लोकांकडून जितके प्रेम मिळते, त्या तुलनेत मी फार कमी परतफेड करू शकतो. मला ही गोष्ट आतल्या आत खात राहते’, असे अमिताभ यांनी लिहिले आहे.अमिताभ लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ दिसणार आहेत. यात रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. साऊथ सुपरस्टार नागार्जुन यात खास भूमिकेत आहे. पुढील वर्षी १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होतोय.