1998 साली प्रदर्शित झालेला ‘सूर्यवंशम’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. मात्र आजही या सिनेमाचे नाव लोकांच्या चांगलेच लक्षात आहे. याला कारण म्हणजे, सेटमॅक्स या चॅनेलवर अनेकवेळा हा सिनेमा दाखवला जातो. याचे कारण म्हणजे सेट मॅक्सने या सिनेमाचे 100 वर्षांपर्यंतचे हक्क विकत घेतले आहेत.
कुटुंबव्यवस्था आणि नातेसंबंधांवर भर देणारा, विविध भावभावनांची सरमिसळ असलेला सूर्यवंशम हा सिनेमा तेलुगु दिग्दर्शक ई. व्ही. व्ही. सत्यनारायण यांचा बॉलिवूडमधील पहिलाच सिनेमा होता. त्यांनी दिग्दर्शित केलेला आतापर्यंतचा हा पहिला आणि एकमेव हिंदी सिनेमा आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. त्यांनी या चित्रपटात दोन भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटातील त्यांच्या दोन्ही नायिका या दाक्षिणात्य अभिनेत्री होत्या.
‘सूर्यवंशम’ या चित्रपटातील पात्र, कथा आणि संवाद आता प्रेक्षकांना तोंडपाठ झालेले आहेत. हिरा ठाकूर, गौरी, मेजर रंजित हे पात्र तर प्रेक्षकांचे प्रचंड लाडके आहेत. तसेच या चित्रपटातील कादर खान आणि अनुपम खेर यांची कॉमेडी देखील प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. या सिनेमातील आणखी एक चेहरा तुम्हाला आठवत असेल, तो म्हणजे भानुप्रतापच्या नातवाची भूमिका साकारणारा बाल कलाकार. ठाकूर भानुप्रताप यांना खीर देणारा हा बालकलाकार आता मोठा झाला आहे. त्याचे नाव आनंद वर्धन असून तो आता अभिनेता बनला आहे.
आनंद हा तेलगू इंडस्ट्रीत अभिनय करत असून त्याने 20 हून अधिक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. आनंद प्रख्यात गायक बीपी श्रीनिवास यांचा नातू आहे. आपला नातू अभिनेता व्हावा, अशी बीपींची इच्छा होती. त्यामुळे ते नेहमी फिल्ममेकर्सकडे त्याला घेऊन जात. एकदा दिग्दर्शक गुणशंकर यांनी आनंदला पाहिले आणि ‘रामायणम’ या सिनेमात त्याला घेतले. यानंतर आनंदने तेलगू आणि तामिळ भाषेतील ‘सूर्यवंशम’मध्ये काम केले. हाच सिनेमा हिंदीत बनवण्यात आल्यानंतर त्याला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाच्यावेळी तो 13 वर्षांचा होता.