महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईकरांना दिली शिकवण; वर्सोवा बीचवर अर्धा तास केली स्वच्छता !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2017 4:44 PM
महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना एक शिकवण दिली आहे. महानायकांनी दिलेली ही शिकवण खरोखरच प्रेरणादायी असून, सर्वांनीच ...
महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना एक शिकवण दिली आहे. महानायकांनी दिलेली ही शिकवण खरोखरच प्रेरणादायी असून, सर्वांनीच त्याचे अनुकरण करण्याची गरज आहे. आजचा दिवस जेव्हा उगवला तेव्हा महानायक अमिताभ बच्चन चक्क वर्सोवा बीचवर साफसफाई करताना दिसले. अमिताभ यांनी बीचवरील कचरा उचलून स्वच्छता केली. वास्तविक महानायक याठिकाणी एका संस्थेने दिलेल्या निमंत्रणावरून आले होते. जेव्हा ते बीचवर पोहोचले तेव्हा त्यांनी बघितले की, याठिकाणी खूप कचरा आणि पॉलिथीन पडलेले आहे. मग, स्वत: अमिताभ यांनी बीचवर जात साफसफाई केली. तब्बल अर्धा तास त्यांनी याठिकाणी साफसफाई अभियान राबविले. स्वत: महानायक स्वच्छता करीत असल्याचे बघून परिसरातील मुलांनीही या अभियानात सहभाग घेतला. सगळ्यांनी मिळून साफसफाई केली. यावेळी बीएमसीचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी अमिताभ यांनी मुंबईकरांना शिकवण देताना म्हटले की, ‘प्रत्येकवेळी आणि प्रत्येक गोष्टीसाठी बीएमसीला दोष देण्यात काही अर्थ नाही. आपल्याला आपली जबाबदारी समजायला हवी. जर तुम्हाला कचरा दिसत आहे, तर बीएमसीच्या कर्मचाºयांची प्रतीक्षा न करता स्वत:हून साफसफाई करायला हवी’. अमिताभ एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी साफसफाईसाठी मदत व्हावी म्हणून एक जेसीबी आणि एक टॅक्टर देणार असल्याचेही सांगितले. यावेळी यूएन इंडियाचे विजय समनोत्रा, स्थानिक आमदार भारती लवेकर आणि ‘ढाई अक्षर’ या स्थानिक संस्थेची २० मुले उपस्थित होती. महानायक अमिताभ यांचे हे अभियान खरोखरच स्तुत्य आणि कौतुकास्पद होते. त्यामुळे आपणही या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या परिसरातील स्वच्छता करण्याचा संकल्प करूया. सध्या महानायक आमीर खान स्टारर ‘ठग्स आॅफ हिंन्दोस्तान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.