लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘स्वागत सबके लिये यहा पर, लेकीन नही किसीकी प्रतीक्षा...’, या प्रख्यात कवी आणि वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या ओळीवरून आपल्या पहिल्यावहिल्या बंगल्याचे नामकरण ‘प्रतीक्षा’ असे करणारे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी हा बंगला लेक श्वेता नंदा यांच्या नावावर केला आहे. ५० कोटी ६३ लाख रुपये किमतीचा हा बंगला श्वेता नंदा यांना भेट म्हणून देण्यासाठी अमिताभ यांनी ५० लाख ६५ हजार रुपयांचे मुद्रांक शुल्कही नुकतेच भरले आहे.
जुहूच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेला प्रतीक्षा बंगला मुंबईत येणाऱ्या प्रत्येक सिनेप्रेमीसाठी पूजनीय ठिकाण असते. त्यामुळे अमिताभ यांचा हा बंगला पाहण्यासाठी या ठिकाणी कायम गर्दी असते. सुमारे १६ हजार ८४० चौरस फूट अशा विस्तीर्ण जागेवर दिमाखात उभा असलेला हा बंगला ‘गिफ्ट डीड’ करत अमिताभ यांनी श्वेता नंदा यांच्या नावावर केल्याचे समजते. दोन भूखंडांवर हा बंगला उभा असून त्यापैकी एका भूखंडाची मालकी अमिताभ बच्चन व त्यांची पत्नी जया बच्चन यांच्या नावावर आहे तर दुसरा भूखंड हा अमिताभ यांच्या एकट्याच्या नावावर आहे.
पहिला बंगला अमिताभ यांचे जुहू परिसरात प्रतीक्षा, जलसा आणि जनक असे तीन बंगले आहेत. प्रतीक्षा हा बंगला त्यांनी सर्वात प्रथम घेतला होता. त्यावेळी ते आपल्या माता-पित्यांसह तेथे वास्तव्यास होते. श्वेता आणि अभिषेक या त्यांच्या दोन्ही मुलांचे बालपण याच बंगल्यात गेले आहे. माता-पित्यांच्या मृत्यूनंतर अमिताभ हे जलसा बंगल्यात राहण्यासाठी आले. जुलैमध्ये अमिताभ यांनी ओशिवरा येथील एका आलिशान इमारतीमध्ये चार कार्यालयांची खरेदी केली होती. ७ कोटी १८ लाख रुपयांना हा व्यवहार झाला होता.