बॉलिवूडचे प्रसिद्ध ‘खलनायक’ अमरीश पुरी आज आपल्यात नाहीत. पण सिनेप्रेमींच्या मनात ते सदैव जिवंत असतील. आज म्हणजेच २२ जूनला अमरीश पुरी यांचा वाढदिवस आहे. २२ जून १९३२ रोजी जन्मलेल्या अमरीश पुरी यांनी ४०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. खरे तर इतर अभिनेत्यांप्रमाणे तेही हिरो बनण्यासाठी मुंबईमध्ये आले होते. पण निर्मात्यांनी त्यांचा चेहरा पाहून त्यांना हिरोची भूमिका नाकारली होती.
अमरीश पुरी यांचे मोठे भाऊ मदन पुरी आधीपासूनच चित्रपट इंडस्ट्रीमध्ये होते. मोठ्या भावाप्रमाणे इंडस्ट्रीत काम करण्यासाठी अमरीश पुरी मुंबईत दाखल आले. पण पहिल्याच स्क्रिन टेस्टमध्ये ते अपयशी ठरले. तुझा चेहरा हिरोसारखा नाही, असे म्हणून निर्मात्यांनी अमरीश पुरी यांना परत पाठवले होते. यानंतर अमरीश यांनी विमा विभागात नोकरी करायला सुरुवात केली. पण तरीही अभिनयाचा किडा त्यांच्या डोक्यातून जात नव्हता. त्यांनी पृथ्वी थिएटरमधील नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. वयाच्या ४०व्या वर्षी त्यांना पहिला चित्रपट मिळाला. पुढे खलनायक म्हणून त्यांनी स्वत:ची एक खास ओळख निर्माण केली.
बॉलिवूडमधील कलाकारांची मुले देखील आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून या क्षेत्रात करियर करत असल्याचे आपल्याला दिसून येते. पण अमरिश पुरी यांची मुलगी नम्रताला या क्षेत्रात अजिबातच रस नाहीये. अमरउजालाने त्यांची मुलगी नम्रताचा फोटो त्यांच्या वेबसाईटवर पोस्ट केला असून तिच्याविषयी माहिती दिली आहे. त्यांच्या वृत्तानुसार, नम्रता ही सॉफ्टवेअर इंजिनिअर असून ती कॉस्च्युम डिझायनर देखील आहे. तिचे लग्न झाले असून तिला एक मुलगी आहे. नम्रताचे सोशल मीडियावर अकाऊंट असून ती या अकाऊंटवर तिने डिझाईन केलेल्या कपड्यांचे फोटो नेहमीच पोस्ट करते. एका अभिनेत्याची मुलगी असली तरी ती नेहमीच लाईमलाईटपासून दूर राहाण्याचाच प्रयत्न करते. अमरिश पुरी यांना एक मुलगा देखील असून त्याचे नाव राजीव आहे. तो बिझनेसमन आहे.
अमरीश पुरी यांनी इंडस्ट्रीत काम करताना दोन नियम बनवले होते. पहिला म्हणजे ते कधीही कुठल्या मुलाखतीत स्वत:चा आवाज रेकॉर्ड करू देत नव्हते. दुसरा म्हणजे, कव्हर स्टोरीशिवाय ते कुठल्याही मॅगझिनला मुलाखत देत नसत.