सैफ अली खानची एक्स पत्नी आणि ९०चं दशक गाजवणारी बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंग हिने मुंबईत नवीन घर खरेदी केलं आहे. मुंबईतील जुहू येथे अमृताने एक आलिशान फ्लॅट विकत घेतला आहे. याची किंमत कोटींच्या घरात आहे. गेल्यावर्षीच अमृता सिंगने अंधेरीमध्ये २२.२६ कोटींचे दोन ऑफिस खरेदी केले होते. त्यानंतर आता लगेचच तिने मुंबईतच हा नवा लक्झरियस फ्लॅट घेतला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अमृता सिंगने खरेदी केलेल्या या फ्लॅटची किंमत ही तब्बल १८ कोटी रुपये इतकी आहे. पेनिनसुला या बिल्डिंगमध्ये तिने हा फ्लॅट घेतला आहे. २ हजार ७१२ स्क्वे. फूट परिसरात तिचा हा फ्लॅट पसरलेला असून याबरोबरच तिने तीन पार्किंगही खरेदी केल्या आहेत. यासाठी तिने ९० लाख रुपयांची स्टँम ड्युटी केली आहे. तर ३० हजार रजिस्ट्रेशन फी भरली आहे.
अमृता सिंग गेल्या कित्येक काळापासून मोठ्या पडद्यापासून लांब आहे. पण, तरीदेखील ती कोट्यवधींची मालकीण आहे. अभिनयापासून लांब असलेली अमृता ब्रँड अडॉरसमेंटमधून पैसे कमवते. याशिवाय रिअल इस्टेटमधून ती मोठी कमाई करते. अनेक ठिकाणी तिने रिअल इस्टेटमधून गुंतवणूक केली आहे. ती जवळपास ५० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. अमृताने १९९१ साली सैफशी लग्न केलं होतं. तर २००४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना सारा आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत.