अमृता सुभाष (Amruta Subhash) एक हरहुन्नरी अभिनेत्री. भूमिका कुठलीही असो, अमृता तिच्यात जीव ओतते. याच जोरावर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अमृता स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तूर्तास अमृता चर्चेत आहे ती तिच्या ‘दिठी’ या सिनेमामुळे. दिवंगत दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचा ‘दिठी’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. यात अमृता मुख्य भूमिकेत आहे.याच सिनेमाच्या पार्श्वभूमीवर अमृताने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत अमृताने तिच्या विविधांगी भूमिकांमागचे रहस्य उघड केले आहे.
‘मेकर्स माझ्याकडे केवळ एक अभिनेत्री म्हणून पाहत नाहीत. ठराविक किंवा साचेबद्ध भूमिकेसाठी माझा विचार करत नाहीत़, याचा मला आनंद आहे. अभिनेत्री म्हणून ते मला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतात, म्हणूनच वेगवेगळ्या भूमिका घेऊन माझ्याकडे येतात. पडद्यावर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्याची संधी मला मिळते, याचा मला आनंद वाटतो,’ असे तिने सांगितले.
मराठी व हिंदी या सिनेसृष्टीत काम करण्याच्या अनुभवावरही ती बोलली. ती म्हणाली,‘मराठी किंवा हिंदी अशी सीमा मी कधीही आखली नाही. इथे प्रत्येकजण स्वत:तील बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. इथे फक्त चांगले आणि वाईट सिनेमे इतकाच एक फरक असतो. मराठी, हिंदीसोबत विविध भाषेतील सिनेमे मी केलेत. कारण भाषा ही माझ्यासाठी कधीच अडथळा नव्हती. सर्व काही त्या पात्रावर, त्या भूमिकेवर अवलंबून असतं. भूमिकेचा आशय चांगला असेल तर एक चांगला कलाकारही चमकतो.’
अमृताने मराठी, हिंदी व्यतिरिक्त मल्याळम आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांतही काम केले आहे. आई ज्योती सुभाष यांच्याकडून अभिनयाचा वारसा मिळालेल्या अमृताने नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये अभिनयाचे धडे गिरवले आहेत. दिल्लीत एनएसडीत अमृता सत्यदेव दुबेंकडून ती अभिनयातील बारकावे शिकली. तिथे रंगभूमीवर हिंदी, जर्मन नाटकांमध्ये काम केले. महाराष्ट्रात परतल्यानंतर तिला रंगभूमीवर ‘ती फुलराणी’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. ही भूमिका त्यापूर्वी भक्ती बर्वे यांनी साकरली होती. या नाटकातील अमृताच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. २००४ मध्ये ‘श्वास’ या चित्रपटातून अमृताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अमृता उत्तम अभिनेत्री असून ती एक गायिका आणि लेखिकादेखील आहे. तीन वर्षे तिने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. ‘जाता जाता पावसाने’ हा तिचा अल्बम प्रकाशित झाला आहे. याशिवाय हापूस (२०१०), अजिंठा (२०१२) या सिनेमांसाठी अमृताने पार्श्वगायन केले आहे.