बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित 'सॅम बहादूर' हा चित्रपट शुक्रवारी(१ डिसेंबर) प्रदर्शित झाला. विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटातून भारतीय फिल्ड मार्शल माणेक शॉ यांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे. 'सॅम बहादूर' या सिनेमातविकी कौशलने माणेक शॉ यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रादेखील 'सॅम बहादूर'मधील विकीचा अभिनय पाहून भारावून गेले आहेत. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्यांनी ट्वीट केलं आहे.
आनंद महिद्रांनी एक्सवरुन ट्वीट करत 'सॅम बहादूर' सिनेमाचा रिव्ह्यू केला आहे. या सिनेमात विकीचा अभिनय पाहून आनंद महिंद्रा थक्क झाले आहेत. त्यांनी ट्वीटमध्ये विकीचं कौतुक केलं आहे.
'सॅम बहादूर' पाहिल्यानंतर आनंद महिंद्रा यांचं ट्वीट
जेव्हा देशात त्यांच्या नायकांच्या(हिरोंच्या) शौर्यगाथा सांगणारे चित्रपट बनवले जातात, तेव्हा एक शक्तीशाली असं चांगलं चक्र निर्माण होतं. विशेषत: सैनिकांच्या शौर्यगाथा आणि नेतृत्वाच्या कथा यामुळे हे होतं. नागरिकांमध्ये अभिमान आणि आत्मविश्वास वाढतो. यामुळे आणखी नायक उदयास येतात. हॉलिवूडमध्ये शतकानुशतके हे चक्र सुरू आहे. असा चित्रपट बनवण्यासाठी रोना स्क्रूवाला यांचे मी आभार मानतो. चित्रपटात अनेक त्रुटी आहेत. पण, विकी कौशलने ज्याप्रकारे 'सॅम बहादूर' यांची भूमिका साकारली आहे ते पाहून अंगावर शहारे येतात. हा चित्रपट नक्का पाहा आणि आपल्या भारतीय नायकाचा गौरव करा
'सॅम बहादूर' या सिनेमाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. या सिनेमात विकीबरोबर सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेख यांच्या प्रमुख भूमिका आहे. प्रेक्षकांकडूनही या सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी 'सॅम बहादूर'ने बॉक्स ऑफिसवर ५ कोटींची कमाई केली आहे.