Join us

नीता अंबानींची गुजरातीत गुगली, दिलजीत दोसांझने दिलं भारी उत्तर; व्हिडिओ एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 13:27 IST

Anant Ambani- Radhika Merchant Pre Wedding : नीता अंबानींनी गुजरातीत प्रश्न विचारताच दिलजीतची बोलती बंद! व्हिडिओ व्हायरल

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. त्यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. गुजरातमधील जमनागरमध्ये अनंत अंबानी आणि राधिकाचा प्री वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. बॉलिवूडकरांनी त्यांच्या परफॉर्मन्सने अनंत अंबानी-राधिकाच्या प्री वेडिंगला चार चांद लावले. लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसांझने या सोहळ्यात त्याच्या गाण्यांनी सगळ्यांची मनं जिंकून घेतली. पण, यावेळी स्टेजवर गाताना नीता अंबानींनी त्याची गुजरातीत शाळा घेतली. 

अनंत अंबानी-राधिकाच्या प्री वेडिंग फंक्शनमधील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या सोहळ्यातील नीता अंबानी आणि दिलजीत दोसांझ यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत स्टेजवर गाणं गाणाऱ्या दिलजीतला नीता अंबानी गुजरातीत "केम छो?" असं विचारतात. त्यावर दिलजीत त्यांना "मजा मा" असं उत्तर देतो. त्यानंतर नीता अंबानी आणखी एक प्रश्न गुजरातीतून विचारत दिलजीतवर गुगली टाकतात. नीता अंबानींचा हा प्रश्न मात्र दिलजीतला कळत नाही. त्यानंतर नीता अंबानी त्याला इंग्रजीत प्रश्न विचारतात. "तु कुठे राहतोस?" असं विचारताच दिलजीत म्हणतो "मी लोकांच्या हृदयात राहतो." 'विरल भय्यानी' या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

अनंत अंबानी-राधिकाच्या प्री वेडिंगला अनन्या पांडे, करीना कपूर-सैफ अली खान, शाहरुख खान, विकी कौशल-कतरिना कैफ, रणवीर सिंग-दीपिका पादुकोण, आलिया भट- रणबीर कपूर हे सेलिब्रिटीही उपस्थित होते. याबरोबर जगभरातील दिग्गजांना या सोहळ्याचं आमंत्रण होतं. प्री वेडिंग सोहळ्यानंतर अनंत अंबानी-राधिका मर्चंट जुलै महिन्यात लग्नगाठ बांधणार आहेत.  

टॅग्स :नीता अंबानीदिलजीत दोसांझमुकेश अंबानी