ठळक मुद्दे‘मोगली- लीजेंड आॅफ द जंगल’ वॉर्नर ब्रदर्सने प्रोड्यूस केला आहे.
भारतात वेगाने पाय पसरत असलेल्या ‘नेटफ्लिक्स’या डिजिटल प्लॅटफॉर्मवर चिमुकल्यांना वेड लावणारा ‘मोगली- लीजेंड आॅफ द जंगल’ हा चित्रपट रिलीज होत आहे. येत्या ७ डिसेंबरला ‘नेटफ्लिक्स’ हा चित्रपट रिलीज करतोय. आता यात असे काय खास असणार, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. तर यात खास म्हणजे, बॉलिवूडचे अनेक दिग्गज स्टार्स या चित्रपटातील पात्रांना आपला आवाज देणार आहेत.
होय, चित्रपटातील सर्वाधिक आवडत्या शेरखान या पात्राला दिग्गज अभिनेता जॅकी श्रॉफ आपला आवाज देणार आहे. बल्लू हे लोकप्रीय पात्र अभिनेता अनिल कपूरच्या आवाजात बोलताना दिसणार आहे. तर बघिरा या पात्राला ज्युनिअर बच्चन अर्थात अभिषेक बच्चन आपला आवाज देणार आहे. केवळ इतकेच नाही तर बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित हिचा आवाजही आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ती निशा या पात्राला तर करिना कपूर धूर्त अजगराच्या पात्राला आवाज आपला आवाज देणार आहे.
अनिल कपूर व जॅकी श्रॉफ ही जोडी जेव्हाकेव्हा पडद्यावर आली, तेव्हा तेव्हा सुपरहिट ठरली. त्यामुळे ‘नेटफ्लिक्स’च्या या चित्रपटाबद्दल साहजिकचं उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रूडयार्ड किपलिंगच्या ‘द जंगल बुक’ या नॉवेलवर आधारित ‘मोगली’ या चित्रपटाने चिमुकल्यांसोबतचं मोठ्यांनाही वेड लावले आहे. ‘मोगली- लीजेंड आॅफ द जंगल’ वॉर्नर ब्रदर्सने प्रोड्यूस केला आहे. २०१२ मध्ये बनलेला हा चित्रपट खरे तर २०१६ मध्येचं रिलीज होणार होता. मात्र त्याचवर्षी एप्रिलमध्ये डिज्नीचा ‘द जंगल बुक’ रिलीज झाला. या चित्रपटाने जगभरात प्रचंड कमाई केली. भारतातचं या चित्रपटाने १८८ कोटींचा गल्ला जमवला. त्यामुळे वॉर्नर ब्रदर्सने या चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर टाकली होती आणि शेवटी याचे हक्क व्हिडिओ स्ट्रिमिंग वेबसाईट ‘नेटफ्लिक्स’ला विकले होते.