कंगना राणौत आणि दिलजीत दोसांज यांच्यातील ट्विटर वॉर अद्याप लोक विसरले नसताना आता अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांच्यात ट्विटरवर जुंपली. इतकी की, अनुराग कश्यपनेअनिल कपूरच्या ‘बेकार’ चित्रपटांची यादीच प्रसिद्ध केली. मग काय, अनिल कपूरनेही अनुरागला जशास तसे उत्तर दिले. आधी तर दोघांनी गमतीगमतीत एकमेकांवर ताशेरे ओढले. पण अचानक दोघांची गाडी रूळावरून घसरली आणि वेगळ्याच वळणावर पोहोचली.तर या वादाची सुरुवात झाली अनिल कपूरच्या एका सिंपल ट्विटने. अनिलने ट्विटरवर दिल्ली क्राईम सीरिजच्या टीमची प्रशंसा करत एक पोस्ट शेअर केली.
‘तुम्ही डिझर्व्ह करता. आता आणखी काही लोकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळतेय, याचा आनंद आहे,’ असे ट्विट अनिलने केले. यावर अनुरागने असा काही रिप्लाय दिला की, अनिलला तो खटकला.
‘काही चांगल्या लोकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळतेय, याचा आनंद आहेच. पण तुझा ऑस्कर कुठे आहे? नाही? मग किमान नामांकन तरी?’, असे डिवचणारे ट्विट अनुरागने केले. यावर अनिलनेही जशास तसे उत्तर दिले.
‘माझे सोड, तुला तर ऑस्कर तेव्हाच पाहिला असशील जेव्हा स्लमडॉग मिलेनियरला ऑस्कर मिळताना टीव्हीवर पाहिले असशील, ’ असे अनिलने लिहिले. यावर अनुराग कसा शांत बसणार? त्याने अनिलला आणखी डिवचले.
‘स्लमडॉग मिलेनियरसाठी तर शाहरूखला कास्ट करण्याची तयारी सुरु होती. तू कदाचित या चित्रपटासाठी सेकंड च्वॉईस होता ना?’, असा सवाल त्याने केला. अनिलने यावरही उत्तर दिले.
‘कोणी काम सोडले आणि मी ते केले. मला याची अजिबात पर्वा नाही. काम तर काम असते. तुझ्यासारखे काम शोधण्यासाठी केस उपटावे लागत नाहीत,’ असे अनिलने लिहिले. अनुरागने यावर उत्तर दिले.
‘सर, तुम्ही केसांबद्दल तर बोलूच नको. तुम्हाला याच केसांच्या जोरावर चित्रपटात भूमिका मिळतात,’ असे त्याने लिहिले. यावर अनिल कपूरलाही जोर चढला.
‘बेटा, तुला माझ्यासारख्या करिअरसाठी सीरिअस स्किलची गरज आहे. अशीच माझी गाडी 40 वर्षांपासून धावत नाहीये,’ असे त्याने सुनावले. अनिलने करिअरवरून डिवचल्यावर अनुरागही चवताळला.
‘सर, प्रत्येक 40 वर्षे जुन्या गाडीला विंटेज म्हणता येत नाही. काहींना खटारा सुद्धा म्हणतात,’असे जबरदस्त उत्तर त्याने दिले. यावर अनिल कपूरही शांत थोडीच बसणार.
‘माझी गाडी 40 वर्षे तरी चालली. तुझी तर अद्यापही गॅरेजमध्येच उभी आहे,’असे त्याने लिहिले. हा एकमेकांवर कुरघोडी करण्याचा सिलसिला इथेच थांबला नाही. यानंतर दोघांनीही एकमेकांवर असा काही शाब्दिक वार केला की, बघणारेही थक्क झालेत.
‘गाडी रेस 3 असेल तर गॅरेजमध्येच राहिलेली उत्तम,’ असे अनुराग म्हणाला. यावर अनिलने अनुरागला त्याच्या फ्लॉप चित्रपटांची आठवण करून दिली. ‘बॉम्बे वेल्वेट व रेस 3 चे कलेक्शन तर बघ,’ असे त्याने लिहिले.