अनिल कपूरचा आज म्हणजेच 24 डिसेंबरला वाढदिवस असून त्याचा जन्म हा मुंबईतील आहे. त्याने बेटा, लम्हे, जमाई राजा, 1942 : अ लव्ह स्टोरी, जुदाई, आपके दिल मे रहते है, रेस यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्याने केवळ भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनिल कपूर हा बॉलिवूडमधील चॉकलेट हिरो मानला जातो. अनिलने वयाची साठी पार केली असली तरी तो आजही एखाद्या तरुण मुलासारखाच दिसतो. आजच्या तरुण अभिनेत्यांना लाजवेल अशी त्याच्यात एनर्जी आहे. त्यामुळे अनिल कपूरचे नेहमीच कौतुक केले जाते.
अनिल कपूरने हमारे तुम्हारे या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात संजीव कुमार, राखी, अमजद खान यांच्यासोबत अनिल कपूरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. या चित्रपटातील अनेक गाणी त्या काळात गाजली. या चित्रपटानंतर अनिल कपूरचा वो सात दिन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाने अनिलला खऱ्या अर्थाने सुपरस्टार बनवले. पण तुम्हाला माहीत आहे का, हमारे तुम्हारे हा अनिल कपूरचा पहिला चित्रपट नाहीये. त्याने याआधी देखील एका चित्रपटात काम केले होते. अनिल कपूरने पहिल्या चित्रपटात काम केले त्यावेळी तो केवळ सातवीत होता.
अनिल कपूरने फेस टू फेसमध्ये दिलेल्या मुलाखतीत त्याच्या पहिल्या चित्रपटाविषयी सांगितले होते. अनिल आज खूप मोठा स्टार असला तरी तो आयुष्यात इतके यश मिळवू शकेल असा कधी त्याने विचार देखील केला नव्हता. अनिलला लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात यायचे होते. सातवीत असताना त्याच्या एका मित्राकडून त्याला एका चित्रपटातील छोट्याशा भूमिकेविषयी कळले होते. याविषयी अनिलने त्याच्या मुलाखतीत सांगितले होते की, माझ्या एका मित्राचे वडील हे चित्रपटांमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट पुरवायचे. त्यांच्याकडून मला कळले होते की, माझ्या मित्राचे वडील एका लहान मुलाच्या शोधात आहेत, जो लहान मुलगा शशी कपूर यांच्यासारखा दिसायला पाहिजे. एका चित्रपटात शशी कपूर यांच्या लहानपणीची भूमिका साकारण्यासाठी ते लहान मुलाच्या शोधात होते. मी त्या चित्रपटासाठी ऑडिशन दिले. त्या ऑडिशनमध्ये मी पास झालो. मी चित्रपटात काम करतोय हे मी घरात सांगितलेच नाही आणि मी या चित्रपटाचे चित्रीकरण केले. त्या चित्रपटाचे नाव तू पायल में गीत असे होते.