Join us

​अनिल कपूरला का काढावी लागली मिशी; वाचा यामागची इंटरेस्टिंग स्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2017 4:52 PM

अनिल कपूर बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील आजही एव्हरग्रीन अभिनेता आहे. कारण अनिल कपूरला आतापर्यंत प्रत्येक प्रकारच्या भूमिका साकारताना आपण ...

अनिल कपूर बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील आजही एव्हरग्रीन अभिनेता आहे. कारण अनिल कपूरला आतापर्यंत प्रत्येक प्रकारच्या भूमिका साकारताना आपण बघितले आहे. ज्या जमान्यात चिकण्या हिरोंना मागणी होती, त्या जमान्यात अनिलने मिशीवर ताव देत अभिनयाला सुरुवात केली. पुढे हीच मिशी त्याची ओळखही बनली. मात्र एक वेळ अशीही आली होती की, त्याला त्याची मिशी काढावी लागली.  ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा यश चोपडा ‘लम्हे’ या चित्रपटाची कास्टिंग करत होते. ‘सेटमॅक्स’ या चॅनेलवरील फिलर शोमध्ये अभिनेता शेखर सुमन याने हा रंजक किस्सा शेअर केला होता. शेखरने दिलेल्या माहितीनुसार दिग्दर्शक यश चोपडा यांचा ‘लम्हे’ हा चित्रपट १९९१ मध्ये रिलीज झाला होता. मात्र या चित्रपटाची कल्पना त्यांना तेव्हा सुचली होती जेव्हा ते ‘सिलसिला’ (१९८१) या चित्रपटाची शूटिंग करीत होते. त्यावेळी या चित्रपटासाठी यश चोपडा यांची पहिली पसंती महानायक अमिताभ बच्चन आणि रेखा या जोडीला होती. मात्र नंतर त्यांना जाणीव झाली की, कथेचा विचार केल्यास अमिताभ वयाने खूपच मोठे दिसतील. त्यामुळे त्यांनी अमिताभच्या नावाचा विचार मनातून काढून टाकला व नव्या चेहºयाचा शोध घेण्यास सुरुवात केली. एके दिवशी लेखक हनी ईरानी यांनी यश चोपडा यांना फोटोज्नी भरलेला एक लिफाफा दिला. ज्यावर लिहिले होते की, ‘एक न्यूकमर जो तुमच्या चित्रपटात काम करू इच्छितो’ फोटोज् बघितल्यानंतर यश यांना धक्काच बसला. कारण या लिफाफ्यात सर्व फोटो अनिल कपूरचे होते. त्यावेळी अनिल कपूरकडे इंडस्ट्रीमध्ये ‘उभरता तारा’ म्हणून बघितले जात होते. त्याला तेव्हाच स्टारडम प्राप्त झाले होते. मात्र यश यांनी या भूमिकेसाठी अनिलचा कधी विचारच केला नव्हता. मात्र फोटोज् बघितल्यानंतर त्यांनी अनिलला बोलावून घेतले. पहिल्याच भेटीत अनिलने यश यांना स्पष्ट केले की, कुठल्याही परिस्थिती मला हा चित्रपट करायचा आहे. परंतु यश यांनी तू या कॅरेक्टरसाठी योग्य नसल्याचे सांगितले. कारण तुझे वय जास्त असून, तो या भूमिकेसाठी मला योग्य वाटत नाही, असे यश यांनी स्पष्ट केले. मात्र अनिलने या चित्रपटात काम करण्यासाठी अक्षरश: हट्ट धरला होता. अनिल वारंवार हेच सांगत होता की, या भूमिकेसाठी तो काहीही करायला तयार आहे. तेव्हा यश यांनी अनिलला तू मिशी काढण्यास तयार आहेस काय? असे विचारले. बराच वेळ विचार केल्यानंतर अनिलने मिशी काढण्यास समर्थता दर्शविली. पुढे यश यांनी दुसºयाच दिवशी अनिलला फोटोशूटसाठी बोलाविले. मिशी नसलेला अनिल बघून सगळ्यांनाच धक्का बसला. परंतु, अनिलचा हा लुक यश यांना खूप भावला. त्यांनी अनिलला अभिनेत्री श्रीदेवीसोबत फोटोशूट करण्यास सांगितले. पुढे १९९१ मध्ये ‘लम्हे’ हा चित्रपट रिलीज करण्यात आला. हा चित्रपट दोन शेड्यूलमध्ये रिलीज करण्यात आला होता. पहिल्या शेड्यूलमध्ये राजस्थान, तर दुसºया शेड्यूलमध्ये लंडन येथे चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते. या चित्रपटात श्रीदेवी डबल रोलमध्ये बघावयास मिळाली होती. (आई पल्लवी आणि मुलगी पूजा) जेव्हा श्रीदेवी या चित्रपटाची लंडनमध्ये शूटिंग करीत होती, त्याचदरम्यान तिचे वडील अयप्पन यंगर यांचे निधन झाले होते. त्यामुळे श्रीदेवी शूटिंग सोडून भारतात परतली होती. १६ दिवसांचा ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा ती लंडनला गेली. तिथे गेल्यानंतर पहिल्याच दिवशी तिला एक कॉमेडी सीन शूट करावा लागला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट अन् श्रीदेवीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. त्याव्यतिरिक्त अनुपम खेर यांना बेस्ट कॉमेडियन, हनी ईरानी यांना बेस्ट स्टोरी आणि राही मासूम रजा यांना बेस्ट डायलॉग्ससाठी फिल्मफेअर देण्यात आला. नीता लुल्ला यांना तर बेस्ट कॉस्ट्यूम डिझाइनसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते, तर अनिल कपूर याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर मिळाला होता.