सोनम कपूरच्या राष्ट्रीय पुरस्कारावर अनिल कपूरला वाटतोय गर्व; हर्षवर्धनला मिळाली प्रेरणा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2017 12:06 PM
नुकत्याच पार पडलेल्या ६४व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यात सोनम कपूरला तिच्या ‘नीरजा’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
नुकत्याच पार पडलेल्या ६४व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यात सोनम कपूरला तिच्या ‘नीरजा’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोनमला मिळालेला हा पुरस्कार वडील अनिल कपूर यांना गौरवांकित करणारा वाटत असून, या पुरस्कारामुळे भाऊ हर्षवर्धन याला प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अनिलने प्रीमियम मेन्सवियर ब्रॅण्डच्या ‘सलेक्टिड होम’च्या लॉचिंगप्रसंगी म्हटले की, जेव्हा परिवारातील एखाद्या सदस्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाते, तेव्हा परिवारातील प्रत्येकाला त्याच्यावर गर्व वाटतो. सोनमचा हा पहिलाच पुरस्कार असून, त्यामुळे आम्ही खूप उत्साहित आहोत. सोनमने ‘नीरजा’साठी हा पुरस्कार मिळवून क्रिटिकला चुकीचे सिद्ध केले आहे. यावेळी हर्षवर्धननेही आपल्या बहिणीच्या यशाचे कौतुक केले. तो म्हणाला की, ‘मला असे वाटते की, सोनमचे यश आमच्या परिवाराच्यादृष्टीने खूपच मोठे आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी असून, मला कठोर मेहनत अन् लक्ष्य गाठण्याचे बळ देणारा आहे. सोनमने खूपच कमी वयात हे यश मिळविले आहे. सोनमप्रमाणे मीही अशाप्रकारचा पुरस्कार मिळवण्यासाठी धडपड करणार. कारण मेहनत केल्यास त्याचे फळ निश्चित मिळत असते, असेही हर्षवर्धनने सांगितले. ‘नीरजा’ या चित्रपटात सोनमने परिचारिका ‘नीरजा भनोट’ हे पात्र साकारले आहे. नीरजाने एका अपहरण केलेल्या विमानातील प्रवाशांना वाचविले होते. त्याचाच थरार या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. सोनमने केलेली भूमिका ही खरोखरच कौतुकास्पद आहे.