अनिल कपूर यांनी त्यांच्या कारकीर्दीत कायम वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. कधी अनिल यांनी विनोदी भूमिका करुन प्रेक्षकांना खळखळून हसवलं. तर कधी अॅक्शन सिनेमांमध्ये काम करुन सर्वांनाच थक्क केलं. अनिल यांच्या वयाची साठी ओलांडली असली तरीही त्यांची एनर्जी तरुणांना लाजवेल अशी आहे. अशातच अनिल यांचा आगामी सुभेदार सिनेमाची पहिली झलक समोर आलीय. ही झलक पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सुभेदार सिनेमाची पहिली झलक
अनिल कपूर यांच्या 'सुभेदार' सिनेमाची पहिली झलक भेटीला आलीय. या व्हिडीओत दिसून येतं की, अनिल कपूर बंद दाराआड बसलेले असतात. त्यांच्या दरवाजावर माणसं ठोठावर असतात. "ये म्हाताऱ्या दार उघड.. आतमध्ये लपून बसलाय.." अशा शब्दात काही माणसं दारावर जोरात थपडा मारत असतात. पुढे अनिल कपूर यांच्या लूकची झलक दिसते. त्यांच्या हातात बंदूक असते आणि चेहऱ्यावर रागीट भाव असतात. शेवटी "फौजी तयार..!" असं वाक्य येऊन हा व्हिडीओ संपतो.
सुभेदार ओटीटीवर रिलीज होणार
'सुभेदार'ची ही झक्कास झलक बघून चाहत्यांनी सिनेमाच्या या फर्स्ट लूकला चांगलीच पसंती दर्शवली आहे. अनिल कपूर अनेक दिवसांनी अँग्री यंग मॅनच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा प्राइम व्हिडीओ या ओटीटीवर रिलीज होणार आहे. या सिनेमात अनिल कपूर यांच्यासोबतच आणखी कोण कलाकार दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. लोकांनी कमेंट करुन 'सुभेदार' सिनेमा रजनीकांत यांच्या 'जेलर' सिनेमाचा रिमेक आहे का, ही शक्यता वर्तवली आहे.