बॉक्स ऑफिसवर १ डिसेंबरला दोन बिग बजेट सिनेमे प्रदर्शित झाले. 'सॅम बहादूर' आणि 'ॲनिमल'च्या निमित्ताने प्रेक्षकांना शुक्रवारी मनोरंजनाची मेजवानी मिळाली. दोन्ही चित्रपट प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करताना दिसत आहेत. पण, बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसापासूनच विकी कौशलच्या 'सॅम बाहादूर'वर रणबीर कपूरचा 'ॲनिमल' भारी पडला आहे. प्रदर्शित होताच 'ॲनिमल' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ॲक्शन आणि ड्रामाने भरपूर असलेल्या या सिनेमाचे शो ठिकठिकाणी हाऊसफूल होत आहेत. सात दिवसांत 'ॲनिमल'ने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल, तृप्ती डिमरी अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या कलाकारांच्या 'ॲनिमल'मधील भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. संदीप वांगा रेड्डी यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर डंका वाजवला आहे.पहिल्याच दिवशी 'ॲनिमल'ने बॉक्स ऑफिसवर ६३ कोटींचा गल्ला जमवला होता. तर वीकेंडला या सिनेमाने १३७ कोटींची कमाई केली होती. गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'ॲनिमल'ने अवघ्या सातच दिवसांत शाहरुख खानच्या पठाण आणि जवानचा रेकॉर्ड मोडला आहे. या सिनेमाचं सात दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार 'ॲनिमल'ने सातव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर २५.५० कोटींचा गल्ला जमवला आहे. रणबीर कपूरच्या या चित्रपटाने आत्तापर्यंत ३३८.८५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने पठाण आणि जवानचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. जवानने सात दिवसांत ३१८ कोटींचा गल्ला जमवला होता. तर पठाणने ३२७ कोटींची कमाई केली होती. 'ॲनिमल' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर डंका वाजवला आहे. हा सिनेमा येत्या वीकेंडला ४०० कोटींचा आकडा पार करेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.