Join us  

"माझी मुलगी चित्रपट अर्धवट सोडूनच रडत बाहेर आली", संसदेत रणबीरच्या 'ॲनिमल' चित्रपटावरुन काँग्रेस खासदार भडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 5:47 PM

काँग्रेसच्या खासदार रंजीत रंजन यांनी 'ॲनिमल'वर टीका करत राज्यसभेत हा विषय उपस्थित केला आहे. 

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'ॲनिमल' सिनेमा १ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. ॲक्शन आणि ड्रामाने पुरेपूर असलेला रणबीर कपूरचा हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. एकीकडे 'ॲनिमल' सिनेमातील रणबीरच्या अभिनयाने प्रेक्षक भारावून गेलेले असताना या चित्रपटात दाखवलेल्या हिंसक सीन्स आणि महिलांबाबतच्या गोष्टीवरुन सिनेमावर टिकाही होत आहे.  काँग्रेसच्या खासदार रंजीत रंजन यांनी 'ॲनिमल'वर टीका करत राज्यसभेत हा विषय उपस्थित केला आहे. 

"सिनेमा हा समाजाचा आरसा असतो. आम्ही सिनेमा बघूनच मोठे झाले आहोत. चित्रपटांमुळे समाजावर खासकरून तरूण पिढीवर प्रभाव पडतो. आजकाल काही चित्रपटांमधून मोठ्या प्रमाणात हिंसा दाखविण्यात येत असून त्याचं समर्थन केलं जात आहे. आताच 'ॲनिमल' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. माझी कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी हा सिनेमा पाहण्यासाठी तिच्या मैत्रिणींबरोबर गेली होती. पण, अर्ध्यातूनच ती रडत चित्रपटागृहाबाहेर आली," असं त्या म्हणाल्या. 

३ तास वाया! 'ॲनिमल' पाहिल्यानंतर भारताच्या स्टार क्रिकेटरचं ट्वीट; चांगला अभिनय म्हणजे...

"चित्रपटात महिलांच्या अपमानाचं समर्थन करणं ही योग्य गोष्ट नाही. या सिनेमात ज्याप्रकारे ते पात्र त्याच्या पत्नीबरोबर व्यवहार करताना दाखवलं आहे आणि प्रेक्षकही त्याचं समर्थन करताना दिसत आहेत. याबद्दल गांभीर्याने विचार व्हायला हवं. यासगळ्याचा तरुण पिढीवर परिणाम होतो. नकारात्मक भूमिकेतील या हिरोंना ११-१२वीतील विद्यार्थी त्यांचा आदर्श मानतात," असंही त्या पुढे म्हणाल्या. 

दरम्यान, रणबीरच्या 'ॲनिमल' चित्रपटाने बॉक्स ऑफिसला पछाडलं आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी ६३.८ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर वीकेंडलाही या चित्रपटाने दमदार कमाई केली. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार या सिनेमाने सहाव्या दिवशी ३० कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत 'ॲनिमल' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३१२.९६ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात या चित्रपटाने ५०० कोटींचा आकडा पार केला आहे. 

टॅग्स :रणबीर कपूरकाँग्रेससेलिब्रिटी