रणबीर कपूरचा ब्लॉकबस्टर सिनेमा Animal च्या ओटीटी रिलीजची सगळेच वाट पाहत आहेत. मात्र सिनेमाच्या रिलीजमध्ये एक मोठी अडचण आली आहे. Animal च्या ओटीटी रिलीजवर स्थगिती आणावी अशी याचिका सिनेमाची सहनिर्माती कंपनी सिने 1 स्टुडिओने दिल्ली उच्च न्यायालयात केली. यानंतर न्यायालयाने टीसीरिज आणि नेटफ्लिक्स विरोधात समन जारी केले आहे. त्यामुळे Anminal च्या ओटीटीवर रिलीजच्या मार्गात आता अडथळा निर्माण झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
Animal सिनेमाच्या निर्मात्यांमध्ये टीसीरिज फिल्म्स, भद्रकाली पिक्चर्स आणि सिने 1 स्टुडिओचा समावेश आहे. या तिघांमधील कमाईच्या वितरणाचं हे प्रकरण आहे. Animal सिनेमाने जगभरात 900 कोटींपेक्षा अधिकची कमाई केली. यानंतर सिनेमाच्या ओटीटी रिलीजआधी सहनिर्माते सिने 1 स्टुडिओने यावर स्थगिती आणावी अशी याचिका केली. टीसीरिजने अॅग्रीमेंटचं उल्लंघन केल्याचा आरोप सिने 1 स्टुडिओने केला आहे. त्यांना अॅग्रीमेंटनुसार पैसे देण्यात आलं नसल्याचं सिने 1 स्टुडिओने म्हटलं आहे. सिनेमाच्या एकूण बजेटमध्ये 35 टक्के भाग हा सिने 1 चा होता. मात्र टीसिरीजने परवानगी न घेता याचा वापर फिल्म बनवण्यात सिनेमाची निर्मिती, प्रचार आणि रिलीजमध्ये खर्च केला. तसंच कोणतीही माहिती न देता बॉक्सऑफिसवर नफा कमवला. यानंतरही सिने 1 ला त्यांचा एकही पैसा दिला नाही. सिने 1 ने असेही सांगितले की,'टीसीरिजसोबत आमची जुनी ओळख आहे. पण कराराविषयी त्यांच्याबद्दल अजिबातच सम्मान नाही. मी नात्याचा आदर करतो. म्हणून कोर्टात याचिका करण्याची घाई याआधी केली नाही.'
दुसरीकडे टीसीरिज कडून न्यायालयात उपस्थित असलेले अमित सिब्बल म्हणाले,'फिल्ममध्ये सिने 1 ने एकही पैसा लावला नाही आणि सर्व खर्च टीसीरिजनेच उचलला. 2 ऑगस्ट 2022 रोजी सिने 1 ने सर्व अधिकार सोडले होते ही गोष्ट त्यांनी लपवली. यासाठी त्यांनी 2 कोटी घेतले होते. एकही पैसा न लावता त्यांना 2 कोटी मिळाले.'
दिल्ली उच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर टीसीरिज विरोधात आता समन जारी केले आहे. 20 जानेवारी सकाळी पर्यंत ११ पर्यंत टीसीरिजला उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.