अंकिता लोखंडे ( Ankita Lokhande ) नुकतीच लग्नबंधनात अडकली. विकी जैन याच्यासोबत मोठ्या थाटामाटात तिनं लग्नगाठ बांधली. पण लग्नाच्या धामधुमीत अंकिताच्या पायाला कदाचित दुखापत झाली. अगदी तिच्यावर वॉकरच्या मदतीने चालण्याची वेळ आली. पण अशा अवस्थेतही डान्स विसरले ती अंकिता कुठली? पायाला नीकॅप आणि हातात वॉकर घेऊन ती ‘परदेसी परदेसी जाना नहीं’ गाण्यावर नाचली आणि मग काय, तर ट्रोल झाली.
अंकिताची खास मैत्रिण आशिता धवन हिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अंकिता लोखंडे ‘परदेशी परदेशी जाना नहीं’ या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. ‘मिसेस जैन, लव्ह युअर स्पिरिट. नवीन वर्षाचं स्वागत उडी मारुन करा,’ असा सल्ला आशिताने अंकिताला दिला आहे. अंकिताने हा व्हिडीओ रिपोस्ट केला आहे. ‘पाय मोडला पण हिंमत हरली नाही, नववधूच्या हिंमतीची खरच दाद दिली पाहिजे,’ असं हा व्हिडीओ रिपोस्ट करताना अंकिताने लिहिलं आहे.
काही जणांनी हा व्हिडीओ पाहून अंकिताचं भरभरून कौतुक केलं आहे. पण काहींनी मात्र यानिमित्ताने तिला ट्रोल करण्याची संधी साधली आहे. आता इतकी ओव्हरअॅक्टिंग का? असं एका युजरने लिहिलं आहे. एका युजरने ‘ओव्हर अॅक्टिंग की दुकान’ म्हणत तिला ट्रोल केलं आहे. ‘पाय तर आधीच तुटला होता तरीही तू लग्नात नाचली होतीस, मग आता ही नौटंकी का?’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.
लग्नाला काही दिवस उरले असताना अंकिता लोखंडेच्या पायाला दुखापत झाली होती. डॉक्टरांनी तिला विश्रांतीचा सल्ला देखील दिला होता. मात्र अंकिता तिच्या संगीत सेरेमनीमध्ये पायाच्या दुखापत विसरुन जोरादर डान्स करताना दिसली होती. तिच्या संगीत सेरेमनीला कंगना राणौतपासून अमृता खानविलकरपर्यंत सगळ्यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे अंकिताने तिच्या सासूबाईसोबत सुंदर डान्स केला होता.