बिग बॉस मुळे पुन्हा प्रसिद्धीझोतात आलेली 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आता सिनेमातही झळकत आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात तिने सावरकरांच्या पत्नीची यमुनाबाईची भूमिका साकारली आहे. रणदीप हुड्डासोबतच अंकिताच्याही अभिनयाची प्रशंसा होत आहे. छोट्या शहरातून आल्यावर इंडस्ट्रीचा भाग होऊन जेव्हा तुम्ही पोस्टरवर येता तेव्हा फार आनंद होतो अशी प्रतिक्रिया तिने नुकतीच दिली आहे.
अंकिता म्हणाली, "बाकी कलाकारांना कदाचित सवय झाली असेल पण मला आजही माझं पोस्टर पाहून खूप आनंद होतो. मेहनतीने काम केल्यानंतर मोठ्या पोस्टरवर किंवा 70 एमएम पडद्यावर स्वत:ला पाहणं म्हणजेच काही औरच आहे. तुम्ही कुठूनही आला असाल तुमचा मार्ग तुम्हालाच निवडायचा असतो. मी या इंडस्ट्रीत आले तेव्हा मी विचार करायचे की कसं स्वत:ला सिद्ध करु. माझ्यात नेहमीच आत्मविश्वास होता. जेव्हा मी अभिनय क्षेत्रात आले तेव्हाच ठरवलं होतं की दुसऱ्यांना प्रेरणा देणारे पात्र साकारायचे. नशिबाने मला तशा भूमिका मिळाल्या. मग मणिकर्णिका असो किंवा पवित्र रिश्ता. जेव्हा मी अशा भूमिका करते तेव्हा मला सशक्त असल्याची जाणीव होते."
ती पुढे म्हणते, "बाहेरुन इंडस्ट्रीत येणाऱ्यांना मी नेहमी हेच सांगेन की जेव्हा काम मिळेल तेव्हा असं नका समजू की हेही पाहिजे तेही पाहिजे. ही झगमगती दुनिया आहे जी तुम्हाला असमंजस बनवू पाहते. पण तुम्हाला स्वत:वर विश्वास असेल तर तुम्ही स्वत:च रस्ता शोधता."
अंकिताने कालच स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाच्या प्रीमिअरला हजेरी लावली. यावेळी तिला पाठिंबा देण्यासाठी तिचं कुटुंब आणि बिग बॉसचे अनेक सदस्यही आले होते. अंकिता पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्रीत सक्रीय झालेली पाहायला मिळत आहे.