सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड असून त्यात ऐतिहासिक चित्रपट बनवण्याकडे निर्मात्यांचा कल असल्याचे पाहायला मिळते आहे. अभिनेत्री कंगना रानौत राणी लक्ष्मीबाईची कथा रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. मणिकर्णिका :द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटातील विजयी भव हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर आता या सिनेमातील दुसरे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. 'मैं रहू या ना रहू भारत ये रहना चाहिए' असे या गाण्याचे बोल आहेत.
'मैं रहू या ना रहू भारत ये रहना चाहिए' हे प्रसून जोशी यांच्या लेखणीतून साकार झाले असून शंकर महादेवन यांनी स्वरसाज दिला आहे. या गाण्याला संगीत शंकर एहसान लॉय यांनी दिले आहे. या गाण्याला कमी कलावधीतच खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
कंगनाचा ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ हा चित्रपट राणी लक्ष्मीबाई यांची शौर्यगाथा आहे. यात कंगना राणी लक्ष्मीबाईची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे कंगना प्रथमच दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवतेय. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. त्यामुळे ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ला बॉक्सआॅफिसवर किती यश मिळते, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
क्रिश हे या चित्रपटाचे अधिकृत दिग्दर्शक आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रपट पूर्ण झाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटात काही पॅचवर्क व नवे सीन्स टाकण्याचा निर्णय घेतला. पण तोपर्यंत क्रिश आपल्या दुस-या प्रोजेक्टमध्ये बिझी झालेत. त्यांच्या अनुपस्थित चित्रपटाचे काम कोण पुढे नेणार हा प्रश्न असताना कंगनाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली. या चित्रपटात कंगना झाशीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका करताना दिसणार आहे. सोबतच ती या चित्रपटाची सहदिग्दर्शिकाही आहे. राणी लक्ष्मीबाईचा संघर्ष, त्यांचे शौर्य असे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हिंदी शिवाय हा चित्रपट तामिळ व तेलगू भाषेतही डब करण्यात आला आहे. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. विशेष म्हणजे, नेमक्या याच दिवशी हृतिक रोशनचा ‘सुपर 30’ रिलीज होणार असल्याने बॉक्सआॅफिसवर हृतिक विरुद्ध कंगना असा मुकाबला पाहायला मिळणार आहे.