रविवारी १४ एप्रिलला पहाटे सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यामुळे सर्वांना धक्का बसला. सलमान खान, सलीम खान, अरबाज खान आणि सर्व खान कुटुंब या संकटाच्या काळात एकत्र आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान आणि खान कुटुंबाला सरकार तुमच्यासोबत आहे असं आश्वासन दिलंय. अशातच या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे. हरियाणातून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे.
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांची कारवाई सुरूच आहे. दोन आरोपींना अटक केल्यानंतर आता आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी 17 एप्रिलला रात्री एका संशयिताला अटक केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोई टोळी आणि गोळीबार करणाऱ्यांमध्ये संपर्काचे काम केले होते. या व्यक्तीला हरियाणातून पोलिसांनी बेड्या ठोकल्याा आहेत.
नेमकं प्रकरण काय?
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करण्याची घटना रविवारी(१४ एप्रिल) घडली. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली होती. विक्की गुप्ता (२४) आणि सागर पाल (२१) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या दोघांनाही १० दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आता हरियाणातील आणखी एका व्यक्तीला अटक केल्याने या प्रकरणाला काय वळण लागणार, हे पाहायचं आहेे.