Join us

यशाच्या उंच शिखरावर असणाऱ्या अनु अग्रवालचं 'त्या' अपघाताने बदललं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 6:30 PM

29 दिवस ती कोमात होती.

फिल्म इंडस्ट्री एक अशी जागा आहे जिथे प्रत्येकजण या झगमगत्या दुनियेत स्वत:ला हरवून बसतो. या इंडस्ट्रीमधील बरेच कलाकार आले आणि त्यानंतर ते गायब झाले. यातीलच एक कलाकार आहे आशिकी फेम अनु अग्रवाल. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ या सिनेमाने लोकांना अक्षरश: वेड लावले. यातली गाणीही तुफान गाजली. राहुल रॉय आणि अनु अग्रवाल या जोडीनेही लोकांच्या मनात घर केले. आजही या जोडीला लोक विसरू शकलेले नाहीत, हेच या चित्रपटाचे यश आहे. ‘आशिकी’ने तिला एका रात्रीत स्टार केले आणि नियतीने एकाच रात्रीत तिला बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर केले. एका अपघाताने तिचे अख्खे आयुष्य बदलले.

‘आशिकी’नंतर अनूचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते. करियर रुळावर आणण्याचा प्रयत्न करत असतानाच 1999 मध्ये तिच्या गाडीला अपघात झाला. १९९९ मध्ये एका रात्री पार्टीहून घरी परतत असताना अनुच्या गाडीला भीषण अपघात झाला. एका कारने तिच्या कारला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, अनु रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. भर रस्त्यात झालेल्या या अपघातानंतरही अनुला कोणी ओळखूही शकले नव्हते.

कुणीतरी पोलिसांना कॉल केला आणि पोलिसांनी जखमी अवस्थेतील अनुला रुग्णालयात दाखल केले. या अपघातानंतर अनु जवळपास २९ दिवस कोमात गेली. इतकेच नाही तर तिची स्मरणशक्तीही गेली.

सुदैवाने ती कोमातून बाहेर आली पण तोपर्यंत आयुष्य बदलले होते. भूतकाळातील काहीही अनुला आठवेना. पुढे स्मरणशक्ती परत मिळवण्यासाठी अनु बिहार येथील मुंगेरस्थित प्रसिद्ध योग साधना केंद्रात गेली. स्मरणशक्ती पुन्हा मिळविण्यासाठी तिने कठीण योगसाधना केली. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर अनुची स्मरणशक्ती पूर्वपदावर आली खरी. पण तोपर्यंत बराच काळ लोटला होता. या काळात बॉलिवूडमधील लोकांनाही तिचा विसर पडला होता.

टॅग्स :राहुल रॉय