'आशिकी गर्ल' म्हणून रातोरात प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे अनु अग्रवाल (anu aggarwal) . या सिनेमाने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. मात्र, एका अपघातामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. इतकंच नाही तर ती कलाविश्वापासून दूर गेली. परंतु, या अपघातापूर्वी म्हणजे आशिकी (aashiqui) रिलीज झाल्यानंतरच अनु बॉलिवूडपासून दूर जाणार होती. मात्र, तिला ते शक्य झालं नाही. याविषयी तिने एक मुलाखत दिली आणि तिला बॉलिवूड का सोडायचं होतं हे सांगितलं.
"त्या काळात मी मॉडलिंग करत होते आणि पॅरिसमध्ये होते. सिनेमामध्ये येण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. काही कामानिमित्त मी १० दिवसांसाठी मुंबईमध्ये आले होते. याच काळात महेश भट्ट यांची नजर माझ्यावर पडली आणि त्यांनी मला सिनेमाची ऑफर दिली. त्यावेळी मी विचार केला होता की हा एक सिनेमा करायचा आणि मग परत पॅरिसला जायचं. पण ते शक्य झालं नाही", असं अनु म्हणाली.
पुढे ती म्हणते, "या पहिल्याच चित्रपटाला इतकी लोकप्रियता मिळाली की मी विचार करु शकत नाही. कदाचित देवाने माझ्यासाठी काहीतरी वेगळंच नशीब लिहून ठेवलं होतं. पण, १९९४ मध्ये मी सिनेमात काम करणं बंद केलं. माझ्या मनात आध्यात्मिकतेचे विचार येत होते. त्यानंतर मी १९९७ मध्ये मी योगा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर २ वर्षांनी माझा अपघात झाला. या अपघातानंतर मी कलाविश्वातून पूर्णपणे संन्यास घेतला."
दरम्यान, अनुचा कार अपघात झाल्यानंतर ती २९ दिवस कोमामध्ये होती. या अपघातानंतर तिचं करिअर संपल्यात जमा झालं. त्यामुळे ती पडद्यापासून दुरावली. सध्या ती एक मेंटल हेल्थ फाऊंडेशन चालवते.