Join us

अनुपम खेर यांनी विकत घेतला 400 रुपयांचा कंगवा, शेअर केला प्रेरणादायी Video

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 2:07 PM

राजू या कंगवा विकणाऱ्या विक्रेत्याशी अनुपम खेर यांचा संवाद फारच प्रेरणादायी आहे

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय असतात. जगभरात कुठेही फिरताना त्यांना काही वेगळं दिसलं तर ते लगेच व्हिडिओ काढत इन्स्टाग्रामवर शेअर करतात. मुंबईत फिरताना तर अनेकदा ते गरीब लहान मुलांचे, कष्ट करणाऱ्यांचे व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांना सामाजिक जाण आहे हेच यातून स्पष्ट होतं.नुकताच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रस्त्यावर कंगवा विकणाऱ्या माणसाचा तो व्हिडिओ आहे. अनुपम खेर गरज नसतानाही त्याच्याकडून कंगवा घेत आहेत. चाहत्यांना अनुपम खेर यांची ही कृती खूप आवडली आहे.

अनुपम खेर हे आपल्या कारमधून मुंबईतील रस्त्यावरुन जात असतानाच त्यांना 'राजू' नावाचे वयस्कर गृहस्थ दिसले. त्यांचा वाढदिवस होता. अनुपम खेर यांनी त्यांची विचारपूस केली. त्यांना ४०० रुपये दिले. तर राजू यांनी त्यांना कंगवा दिला. तुमच्या या पैशात माझे सगळे कंगवे विकले जातील असं ते म्हणाले. तसंच बांद्रापासून मी चालतो आलो आहे मी मेहनत करतो असंही ते म्हणाले. अनुपम खेर यांच्यासोबतचा त्यांचा संवाद फारच भावूक करणारा आहे. या व्हिडिओसोबत खेर यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, "bald and beautiful. मुंबईत एक मजेशीर भेट. राजू मुंबईच्या रस्त्यावर कंगवे विकतो. मला तर कंगवा खरेदी करण्याचं काही कारणच नाही. पण आज त्याचा वाढदिवस होता. त्याला वाटले जर मी एक कंगवा घेतला तर त्याची सुरुवात चांगली होईल. मला खात्री होती की त्याने त्याच्या जीवनात चांगले दिवस पाहिले आहेत. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य फारच प्रेरणादायी होतं. तुम्ही जर कधी त्याला भेटलात तर त्याच्याकडून नक्की कंगवा घ्या. मग तुमच्या डोक्यावर केस असो किंवा नसो काही फरक पडत नाही. तो त्याच्या साध्या वागणूकीतून तुमचा दिवस प्रकाशमय करेल."

राजूनेही अनुपम खेर यांना ओळखले होते. राजू त्यावेळी खूपच खूश झाले. खेर यांनी त्यांच्या कुटुंबाचीही विचारपूस केली आणि त्यांच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मेहनत करणाऱ्यांना कायमच आदर मिळतो मग ते काम छोटं असो किंवा मोठं फरक पडत नाही हेच खेर यांनी या व्हिडिओमधून दाखवले आहे.

टॅग्स :अनुपम खेरबॉलिवूडमुंबईसोशल मीडिया