Join us

पहलगाम हल्ल्यानंतर अनुपम खेर यांना अश्रू अनावर, सरकार हात जोडून केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 13:33 IST

अभिनेते अनुपम खेर यांनी सरकारकडे दहशतवाद्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

 Pahalgam Terror Attack:  'भारताचं स्वित्झर्लंड' म्हणून ओळखलं जाणाऱ्या जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. बैसरन खोऱ्यातील भूमी पर्यटकांच्या रक्तानं माखली. पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २८ पेक्षा जास्त निष्पाप पर्यटकांचा मृत्यू  झाला. यात धक्कादायक बाब म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. पर्यटकांवरील भ्याड हल्ल्यानंतर सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. अनेक कलाकारांनीही सोशल मीडियावर पोस्ट करुन हल्ल्याचा निषेध केला आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी सरकारकडे दहशतवाद्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

अनुपम खेर यांनी सोशल मीडियावरएक व्हिडीओ पोस्ट केलाय. ज्यात कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, "चुकीचं.. चुकीचं... चुकीचं!!! पहलगाम हत्याकांड !! शब्द आज नपुंसक झालेत". अनुपम यांना हल्ल्याबद्दल बोलताना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. व्हिडीओमध्ये ते म्हणाले, "आज पहलगाममध्ये नरसंहार झाला. या हल्ल्यात २८ पर्यटक मारले गेलेत. मनात खूप दुःख आहे, त्यासोबत रागाला आता सीमा नाहीये. मी आयुष्यात काश्मीरमधील लोकांसोबत हे घडताना पाहिले आहे. 'कश्मीर फाईल्स' चित्रपट हा त्याच प्रकारावर प्रकाश टाकणारी छोटी झलक होती. पण, अनेकांनी सिनेमाला नावे ठेवली, प्रोपगंडा म्हटलं.".

पुढे ते म्हणाले, "देशाच्या विविध भागातून लोक सुट्ट्या घालवण्यासाठी काश्मीरमध्ये आले होते. त्यांच्या मुलांसह, कुटुंबासह त्यांची निवड करण्यात आली. त्यांचा धर्म विचारण्यात आला आणि नंतर त्यांची हत्या करण्यात आली. काहीवेळा शब्द हे आपल्याला काय वाटते ते व्यक्त करण्यात अपयशी ठरतात. पतीच्या मृतदेहासोबत असलेल्या महिलेला मी विसरू शकत नाही. मी पल्लवीजींची मुलाखत ऐकत होतो, त्या सांगत होत्या की 'माझ्या पतीला मारलं गेलं. मी म्हणाले मलाही मार, माझा मुलगा म्हणाला मलाही मार, पण त्यांनी तसं केलं नाही. कदाचित त्यांना संदेश द्यायचा होता'. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि पूर्ण सरकारला हात जोडून विनंती करतो की, या वेळी दहशतवाद्यांना असा धडा शिकवायला हवा की पुढच्या सात जन्मात असं कृत्य करण्याचं त्यांचं धाडस होणार नाही. दुनियाच्या कोणत्याही भागात असा प्रकार घडणं चुकीचं आहे".

टॅग्स :अनुपम खेरपहलगाम दहशतवादी हल्लाजम्मू-काश्मीरदहशतवादी हल्लादहशतवाददहशतवादी