Join us

अयोध्येत पोहोचले अनुपम खेर, भारतातील 21 हनुमान मंदिरांवरील व्हिडीओ सिरीजीला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 11:58 AM

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर भारतातील 21 लोकप्रिय हनुमान मंदिरांवर व्हिडीओंची सिरीज बनवत आहेत.

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर शुक्रवारी अयोध्येला पोहोचले. येथे त्यांनी राम मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली. शिवाय तिथल्या संतांचीही त्यांनी भेट घेतली. त्यानंतर खेर यांनी हनुमानगढी येथे आरती करून बजरंग बलीचे आशीर्वाद घेतले. यावेवेळी अनुपम खेर पारंपरिक लूकमध्ये पाहायला मिळाले.  भारतातील 21 लोकप्रिय हनुमान मंदिरांवर व्हिडीओंची सिरीज बनवत आहेत. याची सुरुवात त्यांनी हनुमानगढी मंदीरातून  केली. 

 

अनुपम खेर यांनी म्हटले की, " हनुमानजींच्या २१ मंदिरांवर पाच मिनिटांच्या रील रिलीज करणार आहे.  ज्याची सुरुवात अयोध्येतील हनुमान गढी मंदिरापासून होणार आहे.  देश-विदेशातून अयोध्येत येणाऱ्या लोकांनाही मंदिरांची अचूक माहिती मिळायला हवी". ते म्हणाले की, "माझ्या आईचे स्वप्न होते की मी अयोध्येत दर्शन घ्यावे. राम मंदिरात रामलल्ला बसवल्यानंतर मला निमंत्रण मिळाले, तर मी माझ्या आईसोबत दर्शनासाठी येईन, कारण तिची येथे येण्याची खूप इच्छा आहे". 

काश्मीरच्या फाइल्सवरही अनुपम खेर यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, "लोक काश्मीरबद्दल विचारू लागले आहेत, हे या चित्रपटाचे यश आहे. बदलाचा विचार केला तर लाल चौकात ध्वज फडकवणे अवघड होते, आता राष्ट्रीय सणांच्या दिवशी संपूर्ण काश्मीरमध्ये तिरंगा फडकवला जातो. शांततेत बदल घडवून आणण्यासाठी वेळ लागतो". 

अनुपम खेर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, नुकताच त्यांचा चित्रपट 'द व्हॅक्सिन वॉर' प्रदर्शित झाला आहे. आता ते लवकरच कंगना रणौतसोबत 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहेत, ज्यामध्ये ते जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट यावर्षी 24 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांशिवाय यात श्रेयस तळपदे, महिमा चौधरी आणि मिलिंद सोमण सारखे कलाकारही दिसणार आहेत. 

टॅग्स :अनुपम खेरबॉलिवूडराम मंदिरअयोध्या