लोकसभा निवडणूक 2024 चा काल निकाल लागला. भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवता आलं नाही. तर INDIA आघाडीने चांगली मुसंडी घेतली. या निकालामुळे बऱ्याच जणांना धक्काच बसला आहे. आता सरकार नक्की कोणाचं बनतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी निकालानंतर पोस्ट शेअर केली आहे.
अनुपम खेर लिहितात, "कधी कधी विचार करतो की, प्रामाणिक व्यक्तीने अती जास्त प्रामाणिक राहू नये. जंगलात सरळ उगवणारे झाडंच सर्वात आधी छाटले जातात. सर्वात जास्त प्रामाणिक व्यक्तीलाच जास्त कष्ट घ्यावे लागतात. पण तरी तो आपला प्रामाणिकपणा सोडत नाही. म्हणूनच तो कोट्यवधी लोकांसाठी प्रेरणेचा स्त्रोत बनतो. जय हो!" खेर यांनी या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, 'सच्चाई'.
अनुपम खेर यांचा हा निशाणा सरळ अयोध्यावासियांसाठी असल्याचं दिसून येत आहे. नेटकऱ्यांनी 'अयोध्यावासीयांकडून ही अपेक्षा नव्हती' अशा कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी अनुपम खेर यांना सहमती दर्शवली आहे. तर काहींनी मात्र निकालावर आनंदही व्यक्त केला आहे.
अयोध्या येथे राम मंदिर बांधूनही मतदारांनी बीजेपीला मत दिलं नाही यावरुन टीका होत आहे. अयोध्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघात येते. याठिकाणी भाजपाकडून लल्लू सिंह उभे होते तर समाजवादी पार्टीकडून अवधेश प्रसाद होते. अवधेश प्रसाद यांना जास्त मतं पडली आणि भाजपाला अयोध्येतच हार मानावी लागली.