Join us

अभिनयासाठी पुरस्कार न मिळाल्याने अनुपम खेर नाराज, म्हणाले, 'सिनेमासाठी खूश पण...'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 11:35 AM

अनुपम खेर यांची प्रतिक्रिया चर्चेत

नुकतंच ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. गेल्या वर्षी आलेल्या  'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) सिनेमाने बेस्ट फीचर फील्मचा नर्गिस दत्त पुरस्कार पटकावला. यामुळे सिनेमाची संपूर्ण टीम आनंद व्यक्त करत आहे. अभिनेत्री पल्लवी जोशीला सिनेमासाठी सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर दुसरीकडे अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी आनंद व्यक्त करत असतानाच एका नाराजीही बोलून दाखवली आहे.

९० च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची कथा 'द काश्मीर फाईल्स' सिनेमातून मांडण्यात आली आहे. फिल्मने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता राष्ट्रीय पुरस्काराच्या घोषणेनंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, 'काश्मीर फाईल्सला बेस्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला याचा मला खूप आनंद होत आहे. एक अभिनेता म्हणून नाही तर सिनेमाचा एक्झिक्युटिव्ह निर्माता म्हणूनही मी खूश आहे. जर मला माझ्या अभिनयासाठी बेस्ट अॅक्टर पुरस्कार मिळाला असता तर आणखी आनंद झाला असता. पण सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्या तर पुढे काम करण्याची मजा आणि उत्साहच संपेल. चला. पुढच्या वेळी.'

विवेक अग्निहोत्री यांनीही व्हिडिओ शेअर करत आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, 'मी अमेरिकेत आहे. सकाळी मला फोन आला आणि ही आनंदाची बातमी मिळाली. मी नेहमी सांगतो तसं ही माझ्यासाठी फिल्म नाही तर एक माध्यम होतं. काश्मिरी हिंदू, सीख, मुस्लिम, ईसाई, दलित...हा सिनेमा त्यांचा आवाज आहे. त्यांच्या वेदनेचा आवाज आहे जो संपूर्ण जगात पोहोचला. दिवस रात्र मेहनत करुन आम्ही तो जगभरात नेला. आज राष्ट्रीय पुरस्कारामुळे यावर शिक्कामोर्तब झाला. हा अवॉर्ड सर्व पीडितांना समर्पित करतो.'

अनुपम खेर यांच्यासाठी 'द काश्मीर फाईल्स' सिनेमा खूप जवळचा आहे. खेर यांचं कुटुंब मूळचं काश्मिरी पंडितांचं होतं. त्यांच्या कुटुंबियातील सदस्य दहशतवाद्यांच्या जाचाला सामोरे गेले आहेत. त्यामुळे अनुपम खेर यांच्यासाठी सिनेमाला मिळालेला हा पुरस्कारही महत्वाचा आहे.

टॅग्स :अनुपम खेरबॉलिवूडद काश्मीर फाइल्सराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018