Join us

अनुपम खेर यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 2:56 PM

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अनुपम खेर यांची नियुक्ती करण्यात आली होती. सध्या ते त्यांच्या कामामध्ये प्रचंड व्यग्र असल्याने त्यांनी या पदाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदाचा नुकताच राजीनाम दिला आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये एफटीआयआयच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सध्या ते त्यांच्या कामामध्ये प्रचंड व्यग्र असल्याने त्यांनी हा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अनुपम खेर यांनी कालच सूचना आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांना त्यांचा राजीनाम सुपूर्त केला होता आणि आता अनुपम खेर यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली आहे. 

अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, एफटीआयआयचा मी अध्यक्ष असताना मला खूप काही शिकायला मिळाले. एफटीआयआयचा अध्यक्ष असणे हा माझ्यासाठी एक सन्मान होता. पण माझ्या काही आंतरराष्ट्रीय कामांमुळे मी एफटीआयआयला वेळ देऊ शकत नाही आणि त्यामुळे मी या पदाचा राजीनामा देत आहे. 

 

अनुपम खेर यांनी चरित्र अभिनेते म्हणून बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ आपली छाप पाडली आहे. त्यांनी ५००  हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून त्यापैकी कर्मा, चायना गेट, दिलवाले दुल्हनिया ले जाएँगे, कुछ कुछ होता है यांसारखे अनेक चित्रपट गाजले आहेत. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी भारत सरकारने खेर यांना पद्मश्री (२००४) आणि पद्मभूषण (२०१६) या पुरस्कारांनी गौरवले आहे. तसेच अनुपम खेर एफटीआयआयच्या अध्यक्षपदी असण्याआधी त्यांनी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) यांचे अध्यपद भुषवले आहे. 

गजेंद्र चौहान यांच्या जागी अनुपम खेर यांची एफटीआयआयच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली होती. गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयच्या चेअरमनपदावरील नियुक्ती वादग्रस्त ठरली होती. त्यांच्या नियुक्तीवरून विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत तब्बल १३९ दिवसांचा संप पुकारला होता. मात्र विद्यार्थ्यांचा विरोध झुगारून सरकारने गजेंद्र चौहान यांना एफटीआयआयच्या चेअरमनदावर कायम ठेवले होते. मात्र त्यांचा कार्यकाळ संपल्यावर त्यांना मुदतवाढ नाकारण्यात आली होती.   

 

टॅग्स :अनुपम खेरएफटीआयआय