Join us

'किरण खेर यांच्या मृत्यूच्या अफवा करतात अस्वस्थ', खोट्या बातम्या न पसरवण्याची अनुपम खेर यांची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 7:34 PM

अनुपम खेर यांनी पत्नी किरण खेर यांच्या मृत्यूच्या अफवांमुळे मानसिक त्रास होत असल्याचे सांगितले आहे.

अभिनेत्री आणि खासदार किरण खेर यांच्या निधनाचे वृत्त काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशी त्यांच्याबद्दलची अफवा दुसऱ्यांदा पसरवण्यात आली आहे. अशा अफवांमुळे मानसिक त्रास होत असल्याचे अनुपम खेर यांनी सांगितले.

किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यात काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर काही लोक किरण खेर यांच्या निधनाची खोटी बातमी देऊन त्यांना श्रद्धांजली वाहत होते. त्यानंतर अनुपम खेर यांनी ट्विटरवर या बातमीचे खंडन केले होते. अनुपम खेर यांनी ट्विट केले की, किरण खेर यांच्या तब्येतीला घेऊन काही अफवा सुरू आहेत. हे सर्व खोटे आहे. त्या पूर्णपणे बऱ्या आहेत. उलट त्यांनी दुपारी कोरोनाच्या लशीचा दुसरा डोस घेतला आहे.

दरम्यान आता अनुपम खेर यांनी एका वाहिनीशी बोलताना त्यांना अशा बातम्यांमुळे मानसिक त्रास होत असल्याचे सांगितले. एबीपी न्यूजच्या रिपोर्ट्सनुसार, अनुपम खेर यांनी सांगितले की, अशा अफवा मला अस्वस्थ करतात, यामुळे मानसिक त्रासही होतो. अचानक जेव्हा मित्र आणि नातेवाईकांचे रात्री दहानंतर मला फोन येतात आणि किरणच्या प्रकृतीविषयी मला विचारण्यात येते. तेव्हा यांना अचानक काय झालंय? हे असे प्रश्न का विचारतायेत हे मला कळत नाही. पण आता या अफवांबद्दल काय करता येईल? किरण खेर यांच्या तब्येतीबद्दल अनुपम खेर यांनी सांगितले की, सध्या तिची तब्येत चांगली आहे. तिच्यावर सुरु असलेले उपचार फार कठीण आहेत, महिन्यात दोनदा किमोथेरपी घेण्यासाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात जावे लागते. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर खूप चांगले आहेत. परदेशातूनही त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मागील वर्षी ११ नोव्हेंबरला किरण खेर यांना चंदीगड येथील राहत्या घरी डाव्या हाताला दुखापत झाली होती. चंदीगडच्या पोस्ट ग्रॅच्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिचर्स येथे त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या गेल्या होत्या. यावेळी त्यांना मल्टिपल मायलोमा झाल्याचे निदान झाले होते. हा एक प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे. हा कॅन्सर त्यांच्या डाव्या हातापासून उजव्या खांद्यापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे गेल्या ४ डिसेंबरला त्यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले होते. अलीकडे केलेल्या वैद्यकीय चाचण्यांवरून कॅन्सरचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या ४ महिन्यांत त्यांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आहे. आता त्यांना रूग्णालयात भरती होण्याची गरज नाहीये. फक्त चाचण्या व उपचारासाठी नियमितपणे रूग्णालयात जावे लागणार आहे.

टॅग्स :अनुपम खेरकिरण खेर