Join us

The Accidental Prime Minister : अनुपम खेर यांना ऑस्करवारीची घाई!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 12:50 PM

एकीकडे चित्रपट वादात सापडला असताना दुसरीकडे या चित्रपटात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते अनुपम खेर यांना मात्र हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्याची घाई झालेली दिसतेय.

अनुपम खेर स्टारर ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर रिलीज झाला आणि हा चित्रपट वादात सापडला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे तत्कालीन मीडिया सल्लागार संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित या चित्रपटात अनुपम खेर मुख्य भूमिकेत आहेत. मनमोहन सिंग यांची व्यक्तिरेखा ते साकारत आहेत. तूर्तास काँग्रेसने या चित्रपटाला जोरदार विरोध चालवला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि या ट्रेलरनंतर भाजपा विरूद्ध काँग्रेस यांच्यात नवा वाद रंगला. हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसची बदनामी करणारा असल्याचा दावा, काँग्रेसकडून होत आहेत.  या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटावर काँग्रेसजनांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. दिल्ली हायकोर्टात ट्रेलरवर बंदी लादण्याची मागणी करणारी याचिकाही दाखल करण्यात आली आहे. एकीकडे चित्रपट वादात सापडला असताना दुसरीकडे या चित्रपटात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते अनुपम खेर यांना मात्र हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्याची घाई झालेली दिसतेय.

अलीकडे एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांनी ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ ऑस्करसाठी पाठवला जाण्याची आग्रही मागणी पुढे रेटली. आपण कुठपर्यंत भारताची गरीबी विकणार आहोत? कुठपर्यंत भारताचे मागासपण, इथला उपेक्षित वर्ग, इथले हत्ती-माकडं दाखवणार आहोत? ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटात आधुनिक भारताचे राजकारण दाखवले आहे. शानदार दिग्दर्शक, शानदार निर्माता व अभिनेत्यांनी साकारलेला हा चित्रपट आहे. असे चित्रपट ऑस्करसाठी पाठवले जायला हवेत, असे अनुपम खेर म्हणाले.

येत्या ११ जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहांत येत आहे. अनुपम खेर यांच्याशिवाय अक्षय खन्ना, अर्जुन माथुर, बिपीन शर्मा, दिव्या सेठी यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अक्षय खन्नाने यात संजय बारू यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.

टॅग्स :अनुपम खेरद एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर