Anuradha Paudwal Birthday : लता मंगेशकर, आशा भोसले या दिग्गज गायिकांचा बॉलिवूडमध्ये दबदबा होता, अशा काळात एक गोड आवाज म्युझिक इंडस्ट्रीत दाखल झाला आणि बघता बघता या आवाजाने सर्वांनाच भुरळ घातली. हा आवाज होता गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal ) यांचा. लता दीदी, आशा दीदींशी तगडी स्पर्धा होती. पण अशाही परिस्थितीत अनुराधा पौडवाल यांनी स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं. इतकं की नव्वदच्या दशकात बॉलिवूडच्या जवळपास प्रत्येक सिनेमात अनुराधा पौडवाल यांचं एक तरी गाणं असायचं. पण अचानक काही वर्षांनंतर अनुराधा यांनी फिल्मी गाणी गायचं सोडून भक्ती गीत व भजन गायला सुरूवात केली. असं का? असा प्रश्न आजही त्यांच्या चाहत्यांना छळतो.
अनुराधा पौडवाल आज आपला 68 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 1973मध्ये अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांच्या ‘अभिमान’ या चित्रपटातून त्यांच्या संगीत कारकिर्दीची सुरूवात झाली होती. यानंतर लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याजी आनंदजी आणि जयदेव यासारख्या दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी काम केलं. अनुराधांनी अनेक हिट गाणी दिलीत. त्यांच्या आवाजात अशी काही जादू होती की, अनुराधा आता लता मंगेशकर यांची जागा घेतील, असं अनेक संगीत दिग्दर्शक म्हणू लागलं होतं. टी-सीरिजच्या गुलशन कुमार यांनीही त्यांना नव्या युगाची ‘लता’ बनवण्याचा जणू निश्चय केला होता. त्याकाळात टी-सीरिज मोठी कंपनी होती आणि अनुराधा यांनी या कंपनीसाठी शेकडो गाणी गायलीत.
1990 साली त्यांच्या पतीचं निधन झालं आणि अनुराधा कोलमडून पडल्या. या दु:खातून सावरायला त्यांना बराच वेळ लागला. याच काळात टी-सीरिजचे मालक गुलशन कुमार यांच्यासोबतची त्यांची घट्ट मैत्री झाली. अशात अनुराधा यांनी एक निर्णय घेतला आणि असं म्हणतात की हाच निर्णय त्यांच्या करिअरसाठी घातक ठरला. होय, यापुढे फक्त टी-सीरिजसाठीच गाणार, असं त्यांनी जाहिर केलं आणि अनुराधा पौडवाल मागे पडल्या. या काळात अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती या गायिकांची मागणी वाढली आणि अनुराधा यांच्या करिअरला उतरती कळा लागली. 1997 साली गुलशन कुमार यांची हत्या झाली. हा अनुराधा यांच्यासाठी मोठा धक्का होता. पाठोपाठ अनुराधा यांच्या तरूण मुलाचंही निधन झालं. अनुराधा यामुळे कमालीच्या निराश झाल्यात. या काळात अनुराधा भक्तीसंगीताकडे वळल्या. फिल्मी गाणी गाणं त्यांनी पूर्णपणे बंद केलं.
बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट गाणी गाणाऱ्या अनुराधा अचानक इंडस्ट्री सोडून भजनांकडे वळल्या. त्यांचा हा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक होता. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये त्यांनी याबद्दल खुलासा केला होता. ‘बॉलिवूडमध्ये डायरेक्टर आणि प्रोड्यूसर यांच्या मूडनुसार किंवा मग एखाद्या सिनेमामुळे हिट झालेल्या हिरो-हिरोईनच्या मर्जीनुसार गाणी मिळत होती. हे सगळं मला थोडं असुरक्षित वाटू लागलं होतं आणि सुरुवातीपासूनच भक्तिगीते गाण्याकडे माझा कल होता. त्यामुळे बॉलिवूड सोडून भक्तीगीतं गाण्यास मी सुरुवात केली. आशिकी, दिल है की मानता नहीं या चित्रपटातील गाणी हिट झाली होती. करिअर पीकला असताना अचानक मी भक्तीसंगीताकडे वळले होते. काहींना कदाचित माझा हा निर्णय चुकीचा ही वाटत असेल. पण मी माझ्या आयुष्यात समाधानी आहे. काम करण्याची प्रत्येकाची अशी वेगळी पद्धत असते. त्यामुळे कोण चूक किंवा कोण बरोबर हे आपण ठरवू शकत नाही,’ असं त्या म्हणाल्या होत्या.