Join us

"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 13:04 IST

'फुले' सिनेमावरुन अनुराग कश्यपने ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा त्याने पोस्ट करत ब्राह्मण समाजाची माफी मागितली आहे. 

'फुले' सिनेमावरुन अनुराग कश्यपने ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. एका युजरला उत्तर देताना अनुराग कश्यपने आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनाही धमक्या मिळाल्या होत्या. या संपूर्ण प्रकरणानंतर अनुरागने माफी मागण्याची खोचक पोस्ट केली होती. पण, त्याच्या या वक्तव्यामुळे त्याचे ब्राह्मण समाजातील मित्रमैत्रिणीही दुखावले गेले आहेत. त्यामुळे आता पुन्हा त्याने पोस्ट करत ब्राह्मण समाजाची माफी मागितली आहे. 

अनुराग कश्यपची इन्स्टाग्राम पोस्ट

"रागात कोणाला तरी उत्तर देण्याच्या नादात मी माझ्या मर्यादा पार केल्या. आणि संपूर्ण ब्राह्मण समाजाला वाईट बोललो. ब्राह्मण समाजाची अनेक लोक माझ्या आयुष्यात आहेत. त्यांचं मोठं योगदानही आहे. आज ते सर्व माझ्यामुळे दुखावले गेले आहेत. माझे कुटुंबीय माझ्यावर नाराज आहेत. अनेक विद्वान लोक ज्यांचा मी आदर करतो. पण, माझ्या बोलण्यामुळे ते दुखावले गेले आहेत. मी स्वत:च अशी टिप्पणी केल्यामुळे माझाच मुद्दा भरकटला गेला. ब्राह्मण समाजातील त्या व्यक्तींना मला हे बोलायचं नव्हतं. पण, रागाच्या भरात मी बोलून गेलो. त्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो. माझे कुटुंबीय, माझे मित्र मैत्रिणी आणि या समाजाची मी वापरलेल्या अभद्र भाषेसाठी आणि विधानासाठी माफी मागतो. यापुढे असं होणार नाही, याची मी काळजी घेईन. माझ्या रागावर मी काम करेन. त्यासोबतच कोणताही मुद्दा मांडताना  योग्य शब्दांचा वापर करेन. मी अपेक्षा करतो की तुम्ही मला माफ कराल", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, 'फुले' सिनेमाच्या ट्रेलरमधील काही दृश्यांवर ब्राह्मण समाजाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे वाद निर्माण होऊन सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. सेन्सॉर बोर्डानेही यातील काही दृश्यांवर कात्री मारली.  हा सिनेमा आधी ११ एप्रिल महात्मा फुले यांच्या जयंतीला रिलीज होणार होता. आता सिनेमा २५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. 'फुले' या सिनेमाचं दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केलं आहे. तर सिनेमात प्रतिक गांधी आणि पत्रलेखा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

टॅग्स :अनुराग कश्यपसेलिब्रिटी