Join us

फिल्म मेकिंग सोडल्याच्या अफवांवर अनुराग कश्यप संतापला, शाहरुखचं नाव घेतं वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 10:44 IST

अनुराग कश्यप हा नेहमी त्याच्या विधानांमुळे चर्चेत असतो. आताही त्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) याचे हिंदी चित्रपटसृष्टीत मागील काही वर्षांत महत्त्वपूर्ण योगदान आहे. 'गँग्स ऑफ वासेपूर' सारखे हिट सिनेमे देणारा अनुराग हा नेहमी त्याच्या विधानांमुळे चर्चेत असतो. राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरही तो आपलं मत मांडत असतो. अनुराग कश्यप मागील काही काळापासून बॉलीवूडमधील बदलत्या वातावरणावर सातत्याने टीका करताना दिसतो. अलिकडेच त्यानं बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत मायानगरी मुंबई सोडली आणि बंगळुरुला स्थायिक झाला. अनुरागनं मुंबई सोडल्यानंतर त्यानं फिल्म मेकिंगदेखील सोडल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता अनुरागनं थेट बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचं नाव घेत अफवांना पुर्णविराम दिला आहे. 

अनुरागनं 'एक्स' (पुर्वीचे ट्विटर) वर त्याच्या स्पष्ट शैलीत एक ट्विट केलं आहे. त्याने लिहलं, "मी फक्त शहर बदललं आहे, मी चित्रपट निर्मिती सोडलेली नाही. ज्यांना वाटते की मी निराश होऊन निघून गेलो त्यांच्यासाठी, मी येथे आहे आणि मी शाहरुख खानपेक्षा जास्त व्यस्त आहे. माझ्याकडे २०२८ पर्यंतच्या तारखा बुक आहेत. माझे या वर्षी पाच चित्रपट प्रदर्शित होऊ शकतात, किंवा कदाचित या वर्षी तीन आणि पुढच्या वर्षी दोन. मी दररोज तीन प्रोजक्टला नकार देतोय", असं सांगतं त्याने टीकाकारांची बोलती बंद केली आहे. 

अनुराग कश्यप याने वर्षाच्या सुरुवातीला, 'द हिंदू'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुंबई सोडण्याचं कारण स्पष्ट केलं होतं. "हिंदी चित्रपटसृष्टीतील वातावरण आता खूप विषारी बनलं आहे. प्रत्येकजण ५०० किंवा ८०० कोटींचा चित्रपट बनवण्याच्या शर्यतीत आहे. सर्जनशीलता कुठेतरी हरवली आहे. शहर हे फक्त इमारतींनी बनलेलं नसतं, तर तिथे राहणाऱ्या लोकांचं असतं. पण इथे लोक तुम्हाला खाली खेचतात", अस म्हणत त्यानं तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 

अनुरागनं मुंबई सोडली असली तरी त्याचं हिंदी चित्रपटसृष्टीवर बारीक लक्ष आहे. अनंत महादेवन यांच्या 'फुले'वरुन सध्या वाद सुरू आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) 'फुले' चित्रपटावर आक्षेप घेतल्यावर अनुरागनं संताप व्यक्त केला. अनुरागने सीबीएफसीची ही कृतीसेन्सॉरशिपचा गैरवापर आणि सर्जनशील स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचं म्हटलं. 'फुले' या चित्रपटात प्रतीक गांधी आणि पत्रलेखा मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. 

दरम्यान, अनुराग लवकरच  'डकैत' या अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपटात इन्स्पेक्टर स्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूर आणि आदिवी शेष यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अनुरागनं याआधी  'युद्ध', 'लिओ' आणि 'महाराजा' सारख्या चित्रपटांमधून आपलं अभिनय कौशल्य आधीच सिद्ध केल आहे.

टॅग्स :अनुराग कश्यपशाहरुख खानबॉलिवूडमुंबई